Boy Sexually Assaulted In Delhi : राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा हादरवणारी घटना समोर आली आहे. आजकाल प्रत्येक ठिकाणी लैंगिक शोषणाच्या घटना समोर येत आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अशा घटनेचे शिकार झाल्याचे अनेकदा बातमीतून समोर आले आहे. दिल्लीतून अशीच एक भयानक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका खासगी निवारागृहात राहणाऱ्या मुलाचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काल रात्री आमच्या 181 हेल्पलाइनवर कॉल आला आणि सांगितले की दिल्लीतील एका खाजगी निवारागृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे तिथल्या दुसऱ्या मुलाने लैंगिक शोषण केले आहे. आम्ही लगेच पोलिसांना कळवले आणि मुलाची भेट घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. DCW चे अध्यक्षा पुढे म्हणाल्या की, आम्ही दिल्ली पोलिसांना याप्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी नोटीसही बजावली आहे.
गेल्या महिन्यात 31 ऑगस्ट रोजी वॉशरूममध्ये जात असताना ही घटना घडली होती. त्यानंतर त्याच निवारागृहात राहणारा मुलगा आला आणि संबंधित मुुलावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत अल्पवयीन मुलाने निवारागृहाच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली मात्र त्यांनी आरोपी मुलावर कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर मुलाने दिल्ली महिला आयोगाशी संपर्क साधला. आईच्या मृत्युनंतर आणि वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर पीडित मुलगा पाच वर्षांपूर्वी निवारागृहात आला होता.
दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार
दोन दिवसांपूर्वी 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. संतापजनक म्हणजे या वृद्ध महिलेला मोठ्या प्रमाणात मारहाण करून तिचे ओठ ब्लेडने कापण्यात आले आहेत. एवढेच नाही तर त्या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेअंतर्गत दिल्ली महिला आयोगाने शहर पोलिसांना नोटीस पाठवली आहे. आयोगाने सांगितले की, झोपडपट्टीत एकटी राहणाऱ्या 85 वर्षीय पीडितेने असा आरोप केला आहे की, पहाटे 4 वाजता एका व्यक्तीने तिच्या झोपडपट्टीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. दिल्लीच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्तांना पाठवलेल्या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले आहे की, "या महिलेने असेही म्हटले आहे की, आरोपीने तिला सुरूवातीस मारहाण केली, नंतर ब्लेडने तिचे ओठ कापले आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला." तसेच त्या वृद्ध महिलेच्या संपूर्ण शरीरावर आणि गुप्तांगावरही जखमा आढळून आले असल्याचे महिला आयोगाकडून सांगण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या