नांदेड : थकीत वेतनासाठी नांदेडमध्ये वन कामगारांकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे मागील 86 दिवसांपासून वन विभागाच्या कार्यालयासमोर (Forest Department Office) सुरु असलेल्या या आंदोलनातील एका महिलेचा रविवारी मृत्यू झाला आहे. केशाबाई परचाके (वय 64 वर्षे) मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. आंदोलन सुरु असतानाच केशाबाई यांची तब्येत खालावली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली असून, यासाठी वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्ते वन कामगारांनी केला आहे. 


किनवट आणि माहूर वनपरिक्षेत्रातील 62 कामगारांचे एप्रिल 2020 पासून थकीत वेतन मिळण्यासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. गेल्या 5 जून 2023 पासून वन विभागाच्या विभागीय कार्यालयासमोर कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणात कार्यालयाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने चौकशीचा अहवाल दिला नसल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे. तब्बल 86 दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान याच आंदोलनात सहभागी असलेल्या केशाबाई परचाके यांचा आंदोलनाच्या ताणामुळे रक्तदाब वाढून डोक्यात रक्त जमा झाल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान यासाठी वन विभाग जबादार असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. 


'या' आहेत मागण्या! 



  • 62 पैकी किनवट परिक्षेत्रातील 28 कामगारांचे 1 एप्रिल 2020 ते 31 जुलै 2020 या कालावधीतील वेतन देण्यात आले, परंतु 1 ऑगस्ट 2021 नंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर तेथील वेतन अद्याप देण्यात आले नाही. 

  • न्यायालयीन आदेशाप्रमाणे कामगारांना पूर्ववत सलग सेवेसह कामावर घ्यावे.

  • हजेरी कार्ड व वेतन पावती द्यावी ऑगस्ट 2021 पासूनचे वेतन देण्यात यावे, त्याचबरोबर बारमाही रोजंदारी कामगारांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करावी.

  • गेल्या 5 जून 2023 पासून या कामगारांकडून वजीराबाद भागातील विभागीय वन कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

  • कामावरुन कमी केलेल्या कामगारांना परत कामावर घेण्याची मागणी करण्यात येत आहे. 

  • नांदेड जिल्ह्यात एकूण 325 वन कामगार असून, त्यांचे 2020 पासुन वेतन थकीत आहे. 

  • किमान वेतनाप्रमाणे 438 रूपये रोज प्रमाणे देण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Mobile Network : डिजिटलच्या दुनियेतही नेटवर्क नसलेल गावं; फोन करण्यासाठी चक्क डोंगराची वाट धरावी लागते