श्रीहरीकोटा : भारताने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon South Pole) पाऊल ठेवून इतिहास रचला. यानंतर आता चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेबाबत (Chandrayaan 3 Mission) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3 चा विक्रम लँडर आता 'स्लीप मोड'मध्ये गेला आहे. इस्रोच्या चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली, त्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरुन तेथील माहिती गोळा करत आहे. तर, विक्रम लँडर 'स्लीप मोड'मध्ये 4 सप्टेंबर रोजी दिली आहे. लँडर 22 सप्टेंबरला पुन्हा अ‍ॅक्टिव्ह होणं अपेक्षित आहे.


चांद्रयान-3 चा विक्रम लँडर 'स्लीप मोड'मध्ये


भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "चांद्रयान-3 मोहिमेचा लँडर सकाळी 8:00 वाजता स्लीप मोडमध्ये गेला आहे. याआधी ChaSTE, रंभा-एलपी आणि आयएलएसए पेलोडने नवीन जागेवर इन-सीटू प्रयोग केले. यांनी जमा केलेली माहिती पृथ्वीवर पाठवण्यात आली. आता पेलोड बंद करण्यात आले आहेत. लँडरचा रिसिव्हर सुरु ठेवण्यात आला आहे. सोलार ऊर्जा आणि बॅटरी संपल्यानंतर विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हरच्या बाजूला पूर्णपणे झोपी जाईल. लँडर 22 सप्टेंबरला पुन्हा सुरु होण्याची अपेक्षा आहे." 


इस्रोचं अधिकृत ट्वीट






विक्रम लँडरचं पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग


याआधी इस्रोने सोमवारीच ट्वीट करत माहिती दिली होती की, विक्रम लँडर पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरला आहे. इस्रोने यासंदर्भात ट्वीट करत लिहिलं की, ''लँडर विक्रमने चंद्रावर पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग केली. विक्रम लँडरनं ठरलेलं उद्दिष्ट पार केलं आहे. लँडरचा हॉपिंग प्रयोग यशस्वीरित्या पार पडला.


भारताच्या चंद्रावरील मानवी मोहिमांसाठी महत्त्वाचं पाऊल


आदेशानुसार, लँडरचं इंजिन सुरु झालं आणि अपेक्षेप्रमाणे लँडर सुमारे 40 सेंटीमीटरने उंच गेला आणि 30 - 40 सेमी अंतर पार करत सुरक्षितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला. या प्रक्रियेमुळे भविष्यातील चंद्रावर परत येण्याची आणि चंद्रावर मानवी मोहिमांच्या आशा वाढल्या आहेत." यानंतर तैनात केलेले रॅम्प, ChaSTE आणि ILSA परत दुमडले गेले आणि प्रयोगानंतर यशस्वीरित्या पुन्हा तैनात केले गेले.''