एकनाथ खडसेंनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली उद्या मुख्यमंत्री ठाकरेंना भेटणार
एबीपी माझा वेब टीम | 09 Dec 2019 06:19 PM (IST)
एकनाथ खडसे भाजपमधील वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. मात्र, अद्याप त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेला नाही. त्यामुळं आता खडसेंचा वेगळा निर्णय 6 जनपथवरुन होतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी दिल्ली : भाजपमध्ये काही लोकांकडून सातत्याने अपमान होतोय. अपमान असाच सुरु राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असं सांगणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज दिल्ली दरबारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. एकनाथ खडसे भाजपमधील वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. मात्र, अद्याप त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेला नाही. त्यामुळं आता खडसेंचा वेगळा निर्णय 6 जनपथवरुन होतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, उद्या खडसे हे मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भेटणार आहेत. खडसे यांच्या विरोधक नेत्यांशी वाढत्या भेटीमुळे ते काही वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महत्वाची बाब म्हणजे खडसे भाजपच्या नेत्यांची भेट न घेताच मुंबईकडे रवाना होत आहेत. त्यामुळे आता खडसेंचा वेगळा निर्णय म्हणजे शिवसेना प्रवेश असेल का? अशी चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांशी भेटीमध्ये मतदारसंघातील सिंचन योजनांवर चर्चा केली. या योजनांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी पवारांची भेट घेतली असल्याचे खडसे यांनी सांगितले. यावेळी पवारांनी मतदारसंघातील पराभवाबाबत विचारले असल्याचे देखील खडसे यांनी सांगितले. शरद पवारांना भेटायला जाण्याआधी खडसे म्हणाले की, आजवर राजकीय करिअरमध्ये अनेक पक्षांनी मला अनेक वेळा त्यांच्या पक्षात येण्याच्या ऑफर दिल्या. मला वेगवेगळी पदं देण्याच्या ऑफर देखील दिल्या गेल्या. मात्र मी पक्ष सोडण्याचा कधीही विचार केला नाही. पक्ष वाढवला आणि विस्तार केला. मात्र आता पक्षातून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. कारण नसताना आरोप केला जात असेल, हेतुपुरस्पर मला टाळलं जात आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत तरीही मला क्लीन चिट दिली गेली नाही, असे खडसे यांनी पवार यांना भेटायला जाण्याआधी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. हे ही वाचा - भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या?