मुंबई : विधानसभा निवडणूक आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपचे नेते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान काल पकंजा मुंडे यांच्या भेटीनंतर विनोद तावडे यांनी आज एकनाथ खडसे यांची भेट घेतली. मात्र पक्षात कुठलाही वेगळा मतप्रवाह नसल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.


कौटुंबिक कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी विनोद तावडे भेट घेण्यासाठी आले होते. बंडखोरांचं भाजपसमोर कोणतंही आव्हान नाही. भाजप मजबूत पक्ष असून आम्ही सर्व एकत्र आहोत. योग्य वेळी आम्ही एकजूट असल्याचं तुम्हाला दिसून येईल. निवडणुका येतील तेव्हा आमची एकी सर्वांना दिसेल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.




पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांवरही एकनाथ खडसेंनी वक्तव्य केलं. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गोपीनाथ गडावर जाणार आहे. त्यावेळी पंकजा मुंडेंना भेटून चर्चा करणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं. पक्षात सध्या कोणतेही वेगळे मतप्रवाह नाहीत. पक्षात वेगळे मतप्रवाह असल्याच्या बातम्या आम्हाला बाहेरुन कळतात, ज्या आम्हालाच माहित नसतात, असं खडसेंनी म्हटलं. भाजपच्याच लोकांमुळे अनेक भाजपच्या उमेदवारांना पराभूत व्हावं लागलं, या प्रश्नावर बोलणं मात्र एकनाथ खडसेंनी टाळलं.


काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंची भाजपच्या नेतृत्वावर टीका केली होती. सर्वांना एकत्र घेऊन लढले असते तर आणखी 25 जागा नक्की वाढल्या असत्या. ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय? असा प्रश्ना विचारत एकनाथ खडसेंनी भाजपला घरचा आहेर दिला होता. माझ्यासह विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळेंना घेऊन विधानसभा निवडणूक लढली असती, तर 25 जागा नक्की वाढल्या असत्या. पक्ष कधीच चूकत नाही. ज्यांच्या हातात धुरा दिलेली असते, त्यांचे निर्णय चुकू शकतात' असं म्हणत एकनाथ खडसेंनी थेट भाजप नेतृत्त्वावर निशाणा साधला होता. तसेच सिंचन घोटाळ्याचे जे बैलगाडीभर पुरावे होते, ते आम्ही केव्हाच रद्दीत विकले आहेत, कारण त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता, असा टोलाही खडसेंनी लगावला होता.