मुंबई : आपल्याकडून बहुमत सिद्ध होत नसल्याचे लक्षात आल्यावर पहिल्यांदा अजित पवार यांनी आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने आणि सामाजिकदृष्ट्या योग्य तर नाहीच शिवाय ही नामुष्की असल्याचं मत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्याभरापासून सत्तेसाठीचे सर्वच पक्षांकडून जाणाऱ्या तडजोडीमुळे जनता आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे ही खडसे यांनी म्हटलं आहे. मात्र आपल्या जवळ बहुमत नसताना भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवार यांनी शपथ घ्यायलाच नको होती . मात्र या घटनेवरून पुढील काळात बोध घ्यायला हवा.


विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावरून शिवसेना आणि भाजपा मध्ये युती होऊ शकली नाही आणि त्यानंतर सर्वच पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आघाडी करीत असल्याचं पाहायला मिळाले. तर भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जात असल्याने अनाकलनीय असं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळालं आहे.

शिवसेना आणि भाजपचा विचार केला तर या दोन्ही पक्षांना जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. स्पष्ट दिले असताना केवळ मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये झालेला वाद हा जनतेला न पटणारा होता. त्यामुळे ना मला न तुला घाल कुत्र्याला असा प्रकार यामध्ये झालेला आपल्याला दिसत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांचा आणि सामान्य जनतेचा विचार केला तर कोणाचेही असो सरकार लवकर बनले पाहिजे. लोक प्रतिनिधींचा अंकुश असल्याशिवाय जनतेचे प्रश्न त्वरित सोडविण्यास मदत होत असते. हा अंकुश नसेल तर सरकारी अधिकारी जनतेच्या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहात नाहीत. त्यामुळे ज्यांना बनवायचे त्यांनी लवकर सरकार बनवायला पाहिजे असं मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. सरकार कुणाचे बनेल असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले असून या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पहिली तर राज्यपालांनी जी मदत जाहीर केलेली आहे. ती अतिशय अल्प स्वरूपाची आहे. दोन हेक्टरसाठी आठ हजार रुपये मदत वाढवून मिळायला हवी ती किमान पाच हेकटर पर्यंत असायला हवी तरच त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल अस मतही खडसे यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी बातचीत करीत असताना खडसे यांनी हे मत व्यक्त केले आहे.