दरम्यान, निवडणुकांचे निकाल हाती येताच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. जनतेने दिलेल्या या कौलाचा आम्ही स्वीकार करतो, मी माझा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांना पाठवला आहे, असे ते म्हणाले.
या 12 जागांवर विजय मिळाल्याने येदियुरप्पा सरकारला पूर्ण बहुमत मिळाले आहे. यामुळे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. आधी झालेल्या निवडणुकांमध्ये या 15 पैकी 12 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होत. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर पूर्व प्रधानमंत्री एच डी देवगौडा यांच्या जेडीएसला एकही जागा जिंकता आलेली नाही. या 15 पैकी तीन जागा जेडीएसने जिंकल्या होत्या.
पोटनिवडणुकीत भाजपला कमीत कमी सहा जागांवर विजय आवश्यक होतं. जेणेकरुन सभागृहात बहुमत कायम राहिल. कर्नाटक पोटनिवडणुकीत अठानी, कगवाड, गोकाक, येलापूर, हिरेकेरुर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबेलापुर, के.आर. पुरम यशवंतपुरा, महालक्ष्मी ले आऊट, शिवाजीनगर, होसाकोटे, के.आर. पेटे, हुनसूर जागांवर मतदान झालं होतं.
कर्नाटकमध्ये 6 डिसेंबर रोजी 15 विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. 61 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. कर्नाटकमध्ये मतदानानंतर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला 15 पैकी 9 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. मागील निवडणुकांमध्ये 15 पैकी 12 जागा काँग्रेस तर 3 जागा जेडीएसने जिंकल्या होत्या.
224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत. काँग्रेसचे 66 आणि जेडीएसचे 34 आमदार आहेत. आता भाजपचा आकडा वाढून 117 झाला आहे तर काँग्रेसचे 69 आमदार झाले आहेत. बहुमतासाठी 111 या जादुई आकड्याची आवश्यकता आहे. आता या निकालामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत आले आहे.
बी एस येडियुरप्पा यांचं सरकार सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेस-जेडीएस सरकारमधील काँग्रेसच्या 14 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. परिणामी सरकार कोसळलं होतं. माजी विधानसभा अध्यक्षांनी सर्व बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं होतं. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 15 जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. तर दोन जागांबाबत हायकोर्टात खटला सुरु आहे.