मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये मात्र गटातटाचे राजकारण सुरू झालं असल्याची चिन्हं दिसायला लागली आहेत. कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांचं मन वळवण्यासाठी भाजपचे इतर नेते आता त्यांची भेट घेत आहेत.


भाजप नेते विनोद तावडे, राम शिंदे आणि बबनराव लोणीकर यांनी काल पंकजा मुंडे यांची रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. तर आज एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला पोहचले. त्याआधी खडसेंची विनोद तावडेंसोबत मुंबईच्या निवास्थानी खलबतं झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ खडसे यांच्या अनेक नाराज बंडखोर आणि ओबीसी - बहुजन नेत्यांसोबत गाठीभेटी सुरू आहेत. भाजपमधल्या बहुजनांमध्ये वाढत्या असंतोषाला वाट देण्याचं काम खडसे करत असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीआधीची आजची भेट अतिशय महत्त्वाची ठरते.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच पंकजा यांनी फेसबुक पोस्ट टाकून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली होती आणि काल आपल्या ट्विटर हँडल मधूनही भारतीय जनता पक्षाचा उल्लेख काढून टाकल्यामुळे पंकजा मुंडे 12 डिसेंबरला नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र मी भाजप सोडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.  स्वतः विनोद तावडे यांनादेखील बोरिवली मधून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी डावलल्यामुळे तेही नाराज असल्याचे बोललं जातं आहे.

भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सरकार स्थापन करता आलेलं नसल्यामुळे आता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते असा संघर्ष सुरू झाला असल्याची कुजबुज पक्षात सुरू आहे आणि या नाराजांचं नेतृत्व पंकजा मुंडे आणि आता एकनाथ खडसे करत आहेत का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दुसरीकडे, विधानसभा निवडणूक आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपचे नेते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान काल पकंजा मुंडे यांच्या भेटीनंतर विनोद तावडे यांनी आज एकनाथ खडसे यांची भेट घेतली. मात्र पक्षात कुठलाही वेगळा मतप्रवाह नसल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.


आज, बंडखोरांचं भाजपसमोर कोणतंही आव्हान नाही. भाजप मजबूत पक्ष असून आम्ही सर्व एकत्र आहोत. योग्य वेळी आम्ही एकजूट असल्याचं तुम्हाला दिसून येईल. निवडणुका येतील तेव्हा आमची एकी सर्वांना दिसेल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे..




पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांवरही एकनाथ खडसेंनी वक्तव्य केलं. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गोपीनाथ गडावर जाणार आहे. त्यावेळी पंकजा मुंडेंना भेटून चर्चा करणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं. पक्षात सध्या कोणतेही वेगळे मतप्रवाह नाहीत. पक्षात वेगळे मतप्रवाह असल्याच्या बातम्या आम्हाला बाहेरुन कळतात, ज्या आम्हालाच माहित नसतात, असं खडसेंनी म्हटलं. भाजपच्याच लोकांमुळे अनेक भाजपच्या उमेदवारांना पराभूत व्हावं लागलं, या प्रश्नावर बोलणं मात्र एकनाथ खडसेंनी टाळलं.