Bhandara News : शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सकस आहार पुरवठा करुन त्यांचं आरोग्य सुदृढ ठेवण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे. याकरता कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन योजनेच्या (Midday Meal Scheme) सामुग्रीचा पुरवठा करण्यात आला. मात्र, भंडाऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात पुरवठा करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजन योजनेची सामुग्री अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलं आहे. कंत्राटदाराने पुरवलेल्या चणा , वाटाणा आणि डाळीला किडे लागले आहेत.  तर तांदळाच्या कोठीत अक्षर: जिवंत उंदीर आढळून आल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार भंडारदऱ्यातील नेरला इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत घडला आहे. 


मध्यान्ह भोजन आहाराचं राज्यस्तरीय कंत्राट मुंबईच्या एका कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे. त्यांनी भंडारा जिल्ह्याचा आहाराचं पुरवठा करण्याची जबाबदारी गोंदिया इथल्या एका कंत्राटदाराला दिलं असून त्याच्याच माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना मध्यान्ह भोजन आहाराची सामुग्री पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हे साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं तपासणीत सिद्ध झाल्यानं जिल्हा परिषद शिक्षण समितीनं सदर कंत्राटदारानं पुरवठा केलेली सामुग्री वापस न्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी, असा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीनं घेतला आहे. एवढे होऊन देखील संबंधित कंत्राटदाराने साहित्या पुरवठा थांबवलेला नाही. तर शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात शिजवलेल्या भोजनात मोठ्या प्रमाणात किडे आढळून आल्याने गावातील पालकांनी शाळेतील शिक्षकांना धारेवर धरले आहे. 


या संदर्भातील माहिती मिळताच  जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, शिक्षण समिती सभापती रमेश पारधी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी अचानक शालेस भेट दिली. यावेळी संतप्त असलेल्या पालकांनी शाळेच्या मुख्यध्यापकाला चांगलेच धारेवर धरले. आलेल्या अधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहाराची तपासणी केली असता  चणा, वाटाणा, डाळ यात अक्षरश: किडे लागल्याचे आढळून आलेत. तर, तांदूळ ठेवलेल्या टिनाच्या कोठीत जिवंत उंदीर आढळून आला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि तत्काळ चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सदर करण्याचं निर्देश शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी शिक्षण विभागाला दिलं असून कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांचा रोष कमी झाला आहे.


गतिमान सरकार म्हणून राज्य सरकारची ओळख आहे. या सरकारच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा किंवा त्यांच्या भविष्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याच्या वल्गना नेहमी ऐकाला मिळतात. मागील आठवड्यामध्ये शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याहीपेक्षा उत्कृष्ट असं सकस आहार पुरवठा करण्यात येईल, असा मानस राज्य सरकारनं घोषित केलं. मात्र, मागील कंत्राटदाराकडूनच पुरवठा करण्यात आलेले साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्यानं आता भविष्यात पुरवठा होणारे साहित्य किंवा भोजन खरोखरच विद्यार्थ्यांच्या आरोग्यसाठी लाभदायक ठरतील का? असा प्रश्न आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Closing Bell : शेअर बाजारात अस्थिरता; गुंतवणूकदारांच्या एक लाख कोटींचा चुराडा