Bhandara Ladki Bahin Yojana : भंडारा : शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. मुख्यमंत्री साहेब जमलं तर नक्की लाडका भाऊ योजनासुद्धा आणा, अशी मागणी भंडाऱ्यातील एका शेतकरी पुत्रानं केली आहे. अशी योजना काढून मुख्यमंत्र्यांनी तरुणांसह शेतकरी पुत्रांनाही दिलासा द्यावा, अशी मागणीही या युवा शेतकऱ्यानं केली आहे. 


अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) जाहीर करण्यात आली. या योजनेतंर्गत अटी-शर्थींसह योजनेच्या सर्व तरतुदींमध्ये बसणाऱ्या सर्व महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. ही योजना जाहीर केल्यानंतर योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. पण त्यानंतर इतरांकडून या योजनेवर टीकेची झोडही करण्यात आली. तसेच, लाडकी बहीण योजना झाली, आता लाडक्या भावांसाठीही योजना जाहीर करा अशी मागणी करण्यात आली. अशातच आता भंडाऱ्यातील एका शेतकऱ्याच्या मुलानं लाडकी बहीणप्रमाणेच तरुणांसह शेतकरी पुत्रांसाठीही एखादी योजना जाहीर करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 


भंडाऱ्याच्या एका शेतकरी पुत्रानं मुख्यमंत्र्यांकडे तरुणांसह शेतकऱ्यांच्या मुलांसाठीही एखादी योजना जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी पठ्ठ्यानं एक फलक हातात घेतला आणि थेट गावाच्या चौकात उभा ठाकला. या तरुण शेतकऱ्याकडे अवघ्या गावाचं लक्ष लागलं होतं. तरुण शेतकऱ्यानं आपल्या हातात धरलेल्या फलकाकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यानं केलेल्या मागणीमुळे सध्या हा तरुण सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. 


राज्य सरकारनं नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यात महिलांना दीड हजार रुपये महिना मानधन देण्यात येणार आहे. याच धर्तीवर शेतकरी पुत्रांसाठी लाडका भाऊ योजना काढावी, अशी या शेतकरी पुत्राची लक्षवेधी मागणी आहे. जयपाल प्रकाश भांडारकर असं पदवीचं शिक्षण घेणाऱ्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. जयपाल याच्याकडे सहा एकर स्वतःची शेती असून त्यात तो भात पिकासह, बागायती शेती करून उत्पन्न घेतो. मात्र, शेतकरी आणि त्यांच्या पुत्रांची काय दशा आहे? शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मुलीही मिळत नसल्याची खंत या युवा शेतकऱ्यांनं दाखवली आहे. या युवा शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केलेल्या अशा प्रकारच्या अभिनव मागणीची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्र्यांना 'लाडकी बहीण' तर, आम्ही कोण? तृतीयपंथीयांचा मुख्यमंत्र्यांना सवाल