भंडारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) वारे वाहू लागले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) लढत होणार असून भंडारा विधानसभेत (Bhandara Vidhan Sabha Constituency) महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. कारण काँग्रेसला तिकीट गेल्यानं ठाकरेंचे शिवसैनिक बंडखोरी करण्याच्या तयारीत असून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 


पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी एकाही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांबाबत प्रचंड रोष बघायला मिळत आहे. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिवसैनिकांच्या भरोशावर निवडून आले होते आणि नंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने भंडाऱ्याच्या जागेवर ठाकरे गटानं दावा सांगितला होता. विधानसभेची जागा हक्काची असल्यानं ती शिवसेनेला मिळेल, असं बोलल्या जात होतं. मात्र, भंडाऱ्याची जागा शिवसेनेला न देता काँग्रेसनं स्वतःकडं राखून घेतली. भंडाऱ्यात महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसकडून पूजा ठवकर यांना उमेदवारी दिली असून मागील अनेक महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करणारे शिवसैनिक काँग्रेस विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 


भंडारा विधानसभेत तिरंगी लढत?


त्यामुळे या विधानसभेत भंडाऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना नेते नरेंद्र पहाडे यांना तिकीट नं मिळाल्यानं आता ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. भंडारा विधानसभेत शिवसेनेची बंडखोरी करणार असल्यानं या निवडणुकीत शिंदे गटाचे शिवसेना उमेदवार विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेस उमेदवार पूजा ठवकर आणि शिवसेनेचे बंडखोर नरेंद्र पहाडे यांच्यात सामना होण्याची चित्र दिसू लागली आहे.


मी उमेदवारी दाखल करणार : नरेंद्र पहाडे 


याबाबत शिवसेना नेते नरेंद्र पहाडे म्हणाले की,  भंडारा-गोंदिया या जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी भंडाऱ्याची जागा ही हक्काची शिवसेनेची होती. मात्र, पक्ष नेतृत्व ही जागा स्वतःकडं ठेवण्यात कुठेतरी अपयशी ठरलंय. सात विधानसभेत एकही जागा शिवसेनेला नं मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेला उमेदवारी न मिळाल्याने इथले शिवसैनिक आता कुणाकडे बघून शिवसेनेचा झेंडा हातात घेणार? शिवसैनिकांच्या विचारांचा शिवसेनेच्या वरिष्ठांनी कुठेही विचार केला नाही. कार्यकर्ता, पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेता मी माझी उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Devendra Bhuyar : अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला अन् आता अपक्ष लढण्याचा नारा? देवेंद्र भुयारांच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसने चर्चांना उधाण