भंडारा : राज्यातील विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आता अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. अशातच आज राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाची यादी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिल्या यादीमध्ये 38 उमेदवारांचा समावेश असून अनेक दिग्गज नेत्यांचा या यादीत समावेश आहे.
दरम्यान, भंडाऱ्यातील (Bhandara) महाविकास आघाडीतही कार्यकर्त्यांमध्ये तुमसरच्या जागेवरून प्रचंड नाराजी बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीची भंडाऱ्याच्या तुमसरची जागा मविआत कोणत्या पक्षाला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नसतानाचं भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलाय. यानंतर ते तुतारी चिन्हावर उभे राहतील आणि त्यांनाचं महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेलं, असा दावा चरण वाघमारे यांनी केलाय. ऐकुणच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तुमसरच्या जागेवरून खडाजंगी रंगताना अजित पवारांनी या मतदारसंघातून आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आमदार राजू कारेमोरेंना (Raju Karemore) पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे आता त्यांना मविआतून कोण आव्हान देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढून जिंकू- राजू कारेमोरे
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी घोषित झालीय. या यादीत भंडाऱ्याच्या तुमसर विधानसभेचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांचं नावं असून त्यांना पक्ष आणि महायुतीनं पुन्हा एकदा संधी दिली आहे. पहिल्या यादीत नावं झळकल्यानंतर आमदार कारेमोरे (Raju Karemore) यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा मला संधी दिली. पक्ष नेतृत्व आणि महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. तळागाळात जाऊन काम करण्याची पुन्हा संधी दिल्यानं आता महायुतीचे सर्व नेते एकत्रितपणे आम्ही काम करून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढून जिंकू. असा विश्वास यावेळी त्यांनी बोलून दाखवला.
हे ही वाचा