आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही, कोणाकडे काय चाललंय यापेक्षा जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष : नाना पटोले
"आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केले आहे. शिवसेनेचे लोकसभेचे बारा खासदार शिंदे गटात गेल्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.
Bhandara News : "आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भंडाऱ्यात केले आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) लोकसभेचे बारा खासदार शिंदे गटात गेल्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. नाना पटोले सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भंडाऱ्यात जाऊन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांना शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटासोबत गेले याविषयी विचारलं असतं त्यांनी बोलणे टाळले. तर भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर टीका करत बोंड यांच्या बोलण्यात तारतम्य नसल्याचे म्हटले.
कोणाकडे काय चाललंय यापेक्षा जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष : नाना पटोले
"काँग्रेसची लोकांच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही. त्यामुळे कोणाकडे काय चाललं आहे हे बघण्यापेक्षा आमचे लक्ष केवळ जनतेच्या प्रश्नाकडे आहे. राज्यात सध्या पूरस्थिती आहे. भंडाऱ्याच्या जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्या जागरुकतेमुळे इथे जीवितहानी झाली नाही. त्यांचे मी मनापासून जाहीर आभार मानतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राज्याच्या सरकारमध्ये कोणाचे किती आमदार फोडायचे, किती विकत घ्यायचे, लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीना विकत घेण्याची परंपरा सुरु झाली आहे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी जनतेसाठी काम करणारे असतात. म्हणून देशात सुरु असलेली राजकीय उलथापालथ बाजूला सारुन मी विदर्भाच्या दौऱ्यावर आलो आहे," असं नाना पटोले यांनी म्हटलं.
शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात
शिवसेनेचे लोकसभेतील 12 खासदार शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) आणि 12 बंडखोर खासदारांनी मंगळवारी (19 जुलै) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना गटनेता बदलण्याच्या मागणीचं पत्र दिलं. त्यानंतर शिंदे आणि खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदेंनी 12 खासदारांच्या भूमिकेचं स्वागत केलं. शिवाय भावना गवळींचा शिवसेनेच्या मुख्य प्रतोद असा उल्लेख केला. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात खासदार राहुल शेवाळेंचा गटनेता आणि भावना गवळींचा मुख्य प्रतोद असा उल्लेख आहे.
अनिल बोंडे यांच्या बोलण्यात तारतम्य नाही : नाना पटोले
भाजप खासदार अनिल बोंडे काय बोलतात यांच्या बोलण्यात काही तारतम्य राहत नाही, असा टोला नाना पटोल यांनी खोचक टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार तीन चाकी सरकार होती. मात्र समन्वयाचा अभाव असल्यामुळे हे सरकार कोसळल्याचे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केले होते. त्याचाच समाचार नाना पटोले यांनी भंडाऱ्यात घेतला. अनिल बोंडे यांच्या बोलण्यात समन्वय नसल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावला. त्यांच्याविषयी काय बोलावे, आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी बोंडे यांच्या वक्तव्यावर दुर्लक्ष केले.