भंडारा : अतिवृष्टी, किडीच्या प्रादुर्भाव आणि विमा कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करून देखील मोबदला न मिळाल्यानं हतबल झालेल्या दोन शेतकऱ्यांनी चक्क उभे धानचे पीक पेटवून दिले. ही घटना भंडारा जिल्ह्यातील (Bhandara News) वाकेश्र्वर येथे मंगळवारी घडली. सच्छिदानंद लेंडारे आणि गंगाधर खोब्रागडे या असे या दोन संतप्त शेतकऱ्यांची नावे आहे. आधीच अवकाळी पावसामुळे  (Unseasonal Rain) अस्मानी संकटात सापडलेले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच आता शासन आणि विमा कंपन्याकडून होणाऱ्या दिरंगाईला कंटाळून या शेतकाऱ्यांनी उद्विग्न होत त्यांच्या शेतातील धान पिकांना अक्षरशः पेटवून दिले. यावेळी या शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.


संतप्त शेतकऱ्यांनी उद्विग्न होत पेटवले शेत


भंडारा जिल्हा हा प्रामुख्याने धानाच्या पिकासाठी ओळखला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अवेळी पडलेल्या पावसाने इथल्या धान पिकाचे अतोनात नुकसाने केले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असतांनाच आता शासन आणि विमा कंपन्याकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. त्यामुळे या त्रासाला कंटाळून भंडारा जिल्ह्यातील वाकेश्र्वर येथील सच्छिदानंद लेंडारे आणि गंगाधर खोब्रागडे या दोन संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धान पिकाला आग लावून दिली. 


पाठपुरावा करून देखील मोबदला न मिळाल्याने व्यक्त केला रोष


भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेल्या धानपीकाची अक्षरशः नासाडी झाली. त्यानंतर राज्य शासनानं तातडीनं पंचनामा करून अहवाल मागितले. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी देखील झाली. दरम्यान, दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला. त्यानानंतर शासनाकडून मोबदला मिळणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनसुद्धा नुकसान भरपाई मिळालेली नाही. हजारो रुपये खर्चून धान पिकाची शेती पिकवली. मात्र, हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावला. पिकांची नासाडी होऊन शेतीसाठी लावलेला खर्चही निघणार नाही आणि हातात आलेलं तणसही दर्जाहीन असून ते जनावरांनाही चारा खावू घालण्यायोग्य नाही. यामुळं शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडं वारंवार पाठपुरावा केला. परंतु, राज्य शासन असो किंवा स्थानिक प्रशासन यांच्याकडून शेतकऱ्यांची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळं भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झाला. परिणामी, भंडारा जिल्ह्यातील वाकेश्र्वर येथील सच्छिदानंद लेंडारे आणि गंगाधर खोब्रागडे या दोन संतप्त शेतकऱ्यांनी उद्विग्न होत त्यांच्या शेतातील धानपिकांना अक्षरशः आग लावून पेटवून दिले. यावेळी  शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत राज्य सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या :