Bhandara Crime News : भाऊ-बहिण यांच्यात वादावादी होत असते. मात्र, ही भांडण क्षणिक राग असणारी असतात. या नात्यात दोघेही एकमेकांना सांभाळून घेतात. मात्र, भाऊ-बहिणींच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. संशयातून झालेल्या वादात भावाने आपल्या बहिणीला संपवले आहे. या घटनेने बावनकुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भंडाऱ्यातील (Bhandara) सोनुले गावात (Sonule Village) ही धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लहान बहीण ही गावातीलच एका तरुणाच्या प्रेमात पडल्याचा संशय भावाला होता. यातून बहीण भावांमध्ये नेहमी खटके उडायचे. याच संशयातून भावानं सख्ख्या लहान बहिणीसोबत पुन्हा एकदा वाद घातला. घरी कुणीही नसताना बहीण भावाचा वाद विकोपाला गेला. या संतापाच्या भरात भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केली.
भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनुली गावात ही घटना घडली. आशिष गोपीचंद बावनकुळे (22) असं आरोपी भावाचं नावं आहे. तर, अश्विनी (20) असे दुर्देवी बहिणीचं नावं आहे. या घटनेनंतर आरोपी आशिष बावनकुळे याने बहिणीची हत्या लपवण्याचा प्रयत्न केला.
मुलीची हत्या लपवण्याचा प्रयत्न
कुटुंबियांनी मुलीचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा बनाव करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, वरठीचे ठाणेदार अभिजित पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आणि कुटुंबियांच्या उडवाउडवीच्या उत्तरानं पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर सत्य समोर आले. मृत तरुणीची गळा आवळून हत्या झाली असल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून संपवलं
जेवण न दिल्यामुळे महिलेला बेदम मारहाण (Pune Crime) करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज (Katraj Murder) भागातील दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) पतीला अटक केली. पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तानाजी कांबळे (Tanaji Kamble) असे नराधम पतीचे नाव आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Katraj Wife Murder) करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुरा तानाजी कांबळे (वय 42, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय 19) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नराधम पती व्यावसायाने पेंटर असून रोजंदारीवर काम करत होता. कांबळे दररोज घरी येताना मद्यपान करून येत असे. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तानाजी नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला होता. यावेळी त्याने त्याच्या पत्नी माधुरीला जेवायला वाढण्यास सांगितले. यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले. जेवण न दिल्याच्या रागातून तानाजीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरू केलं. यादरम्यान त्याने पत्नी मधुराच्या छातीवर जोर जोरात बुक्क्या मारल्या या मारहणीनंतर माधुरी खाली कोसळली. जखमी झालेल्या मधुराचा यात मृत्यू झाला.