Nashik Sinnar News : शेतकरी (Farmers) आत्महत्येच्या घटनेत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. शेतकरी आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी अनेकदा कर्ज (Loan) काढतो. मात्र त्यांना शेतीवरील कर्ज, सावकारी कर्ज, नापिकी, दुष्काळ, अस्मानी आणि सुलतानी संकट आणि कौटुंबिक दारिद्र्य अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. परिणामी काही शेतकरी नको ते पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवतात. अशीच एक दुर्दैवी घटना सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka News) पांगरी येथे घडली आहे. कर्जाच्या जाचाला कंटाळून शेतकरी गोरख कचरू शिरसाठ यांनी आत्महत्या केली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोरख शिरसाठ यांची पत्नी पोल्ट्रीवर चक्कर मारण्यासाठी गेल्या असता त्यांना गोरख यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत माळवली. घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. सतीश बैरागी यांनी पाहणी करत पंचनामा केला. गोरख यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.
बँकेकडून अधिक रक्कमेची मागणी
गोरख यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत बँकेच्या कर्जामुळे मी आत्महत्या करत आहे, असा उल्लेख त्यांनी केला आहे. चिठ्ठीत म्हटले आहे की, सिन्नर व्यापारी बँकेचे एक लाख रुपये देणे आहे. तसेच बहुउद्देशीय बँकेकडून दोन लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे व्याज धरून अधिक रक्कमेची मागणी बँकेकडून सातत्याने होत होती. बँकेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
राज्य सरकारने (Maharashtra Government) सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर केल्यानंतर देखील बँक कर्ज फेडीसाठी तगादा का लावतात? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. यासंदर्भात योग्य कार्यवाही झाली नाहीतर कायदा हातात घेऊन आंदोलन (Agitation) करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.
नाशिक विभागात २०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2023 दरम्यान नाशिक विभागात (Nashik Division) 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 54 तालुक्यांत आठ महिन्यांत 200 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. जळगाव जिल्ह्यात 104, अहमदनगरमध्ये 48, धुळ्यात ३६, नाशिकमध्ये 8 आणि नंदुरबारमध्ये 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
आणखी वाचा