Bhandara News: भंडारा : भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) खरीप हंगामात 258 शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर 30 जानेवारीपर्यंत 30 लाख 73 हजार 558.65 क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. महानोंदणी अप्लीकेशन आतापर्यंत 1 लाख 53 हजार 709 शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी फक्त 93 हजार 240 शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे. यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत खरेदी कमी प्रमाणात झाल्याने नोंदणीसह धान विक्रीची मुदत दोनदा वाढवून देण्यात आली होती.
ज्यामध्ये धान खरेदीची अंतिम मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत होती. परंतु, मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात धान आणि भरड धान्याची खरेदी अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे खरीप हंगामासाठी खरेदीची मुदत आता पुन्हा 29 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कक्ष विजय मोरे यांनी काढले आहेत. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
धान खरेदी आणि नोंदणीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने खरीप आणि रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. शासनाने खरीप हंगामातील धान खरेदी आणि नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत काल बुधवार 31 जानेवारीला संपली. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळते की नाही याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने धान खरेदी आणि नोंदणीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश काढले. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोबतच खरेदीसाठी ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांना नोंदणीदरम्यान अडचणी येत असल्याने नोंदणीची मुदतसुद्धा 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
धानाची भरडाई ठप्पच
राईस मिलर्सच्या मागण्यांवर शासनाने अद्यापही तोडगा काढला नाही. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल आणि भरडाई पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील 183 धान खरेदी केंद्रावर 23 लाख क्विंटल धान तसाच पडला आहे. यापैकी बराच धान उघड्यावर पडून असल्याने त्याची लवकर उचल न झाल्यास तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.