Bhandara News :  जंगलात परिसरात शिकारीसाठी लावण्यात आलेल्या वीज तारांना स्पर्श झाल्याने त्यात अडकून तरुणाचा मृत्यू झाला.ही घटना भंडारा जिल्ह्यातील खापा दवडीपार जंगलात घडली. अमोल शंकर आडे (27) असं मृत तरुणाचे नावं आहे. 


अमोल आडे हा अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील वाकेश्वर या गावातील रहिवासी आहे. खापा दवडीपार जंगलात ही घटना घडली असून तो शिकारीसाठी गेला की त्याचा घातपात करून त्या ठिकाणी टाकले याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अमोल याची सासुरवाडी ही खापा येथील असून तो एक दिवसांपूर्वी सासुरवाडीत गेला होता. अमोल याचा मृतदेह जंगलातून जाणाऱ्या 11 हजार केव्हीच्या तारांच्या खाली आढळून आला. काही शिकाऱ्यांनी कदाचित शिकारीसाठी त्यावर आकडा टाकला असावा आणि त्या जिवंत तारांना अमोलाचा स्पर्श झाल्यानं त्यात त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवणारी चर्चा सुरू आहे. 


दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता अमोल याचा मृत्यू झाला होता.अमोलचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला की त्याची विजेच्या तारांच्या माध्यमातून कुणी हत्या केली, याबाबत अद्याप स्पष्ट झालं नाही. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 


शिकारीचा हा नवा प्रकार नाही


भंडारा जिल्ह्याचा बहुतांशी भाग हा जंगल परिसर भाग आहे. त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्याच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. शिकाऱ्यांनी आता नवीन शक्कल लढवत, जंगलातून गेलेल्या विजेच्या जिवंत तारांवर आकडा टाकून तो वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्गावर त्यातून सापळा रचला जातो. वन्य प्राण्यांसाठी लावलेल्या सापड्यात अमोल अडकला आणि जीव गमावून बसला असावा अशी चर्चा सुरू आहे. 


भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठा स्फोट; महिन्याभरातील दुसरी घटना


भंडारा (Bhandara) शहरालगत असलेल्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (Ordnance Factory) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी (27 जानेवारी ) सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सीएक्स विभागात हा स्फोट(Bhandara Ordnance Factory Blast) झाला.


या दुर्घटनेत अविनाश भागवत मेश्राम (50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामावर आले होते. ही शिफ्ट पहाटे 6 वाजता सुरू झाली होती. सीएक्स विभागात बारुदचे कोट तयार करण्याचे काम केले जाते, तिथं हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी मृतक अविनाश मेश्राम हे एकटेच होते. त्यामुळे त्यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. या स्फोटामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.