Bhandara News: मनरेगाच्या माध्यमातून नागरिकांच्या हाताला हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या जिल्ह्यांत भंडारा जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. भंडारा जिल्ह्यात मनरेगाची 1 हजार 392 कामं सुरू असून यावर 80 हजार 532 महिला आणि पुरुषांच्या हाताला कामं मिळाली आहेत. मनरेगाच्या कामांमुळे आता गावातच रोजगार उपलब्ध होत असल्याने रोजगाराच्या शोधात गावातून शहराकडे जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
भंडारा जिल्हा सात तालुक्यांनी मिळून बनलेला आहे. या सातही तालुक्यात मनरेगाची कामं सुरू आहेत. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांना भेटी देत असून कामावरील महिला आणि पुरुष मजुरांसोबत हितगुज साधत आहेत. शासकीय कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष बांधावर किंवा सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी ते जातात आणि मजुरांसोबत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत असल्याने मजुरांना प्रेरणा मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा रोजगार देणारी महत्त्वाची योजना म्हणजे 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना'. मनरेगाच्या योजनेची भंडारा जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. मनरेगाच्या माध्यमातून आता गावातच रोजगार मिळत असल्याने शहराकडे जाणाऱ्यांची संख्या या माध्यमातून कमी झाल्याचं बघायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींअंतर्गत सर्व कामांचं नियोजन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या आधीच केलं गेलं असून वार्षिक नियोजन आराखडा सर्व व्यापक बनण्यावर भंडारा जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील 546 ग्रामपंचायतींपैकी 321 ग्रामपंचायतींमध्ये मनरेगा योजनेतून विविध कामं सुरू आहेत. या कामावरील मजुरांना आठ दिवसात मजुरी मिळत आहे.
मनरेगातून केली जात आहेत ही कामं
मनरेगाअंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारची कामं सुरू आहेत. यात भूमिहीन, शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर, शेततळे, फळबाग बंदिस्ती, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड अशी विविध कामं केली जात आहेत. यासोबतच मनरेगातून जलयुक्त शिवार अभियानातील कामंही केली जात आहेत. ज्या मजुरांची नोंदणी झालेली नसेल, अशाही मजुरांना कामं हवी असल्यास त्यांनी ग्रामपंचायतीत संपर्क साधून हाताला कामं मिळवून घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
तालुकानिहाय कामं आणि मजुरांची संख्या
भंडारा तालुक्यात 238 कामांवर 7 हजार 924 मजूर, लाखांदूर तालुक्यात 128 कामांवर 9 हजार 723 मजूर, लाखनी तालुक्यात 152 कामांवर 11 हजार 617, मोहाडी तालुक्यात 288 कामांवर 19 हजार 121, पवनी तालुक्यात 53 कामांवर 5 हजार 50, साकोली तालुक्यात 226 कामांवर 21 हजार 682, तुमसर तालुक्यात 307 कामांवर 5 हजार 415 मजूर कार्यरत आहेत.
हेही वाचा: