भंडारा : मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) साहेब, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या, अन्यथा लग्नासाठी तुम्हीचं मुली शोधून द्या, अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन भंडाऱ्यात (Bhandara News) तरुणांनी अभिनव आंदोलन केले आहे. या अभिनव आंदोलनाची भंडाऱ्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
दिवाळीनंतर लग्न (Marriage) सराई जोरदार सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मुलांना पाच ते दहा एकर शेती असून देखील लग्नासाठी मुलगी दाखवायला किंवा द्यायला कोणीही तयार नाही. कारण शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेत मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकरी मुलांना द्यायला तयार नाही.
शेती मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या
त्यामुळे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, एक तर आमच्या शेत मालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या. ज्या दिवशी तुम्ही आम्हा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव द्याल, त्या दिवसापासून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील आणि प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याला शेती परवडते. तेव्हा ते आपल्या मुलीचा हात शेतकऱ्यांच्या मुलाला देतील, असे तरुणांनी म्हटले आहे.
हातात फलक घेऊन आंदोलन
याबाबत शेतकरी पुत्र जयपाल भांडारकर यांनी म्हटले की, एक तर आमच्या शेतमालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी तरी बघून द्या, अशी विनंती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहोत. दरम्यान, जयपाल भांडारकर यांनी डोक्यात टोप व बाशिंग बांधून नववर शेतकरी मुलांसह हातात फलक घेऊन आंदोलन केले. या आंदोलनाची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या