Bhandara News : भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात चक्क रुग्णांच्या बेडवरचं उंदीर उड्या मारत असल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हा रूग्णालयातील रूग्ण कक्षात उपचारासाठी भरती असलेल्या रूग्णांच्या अंगावरून अक्षरशः आठ ते दहाच्या संख्येत असलेल्या उंदराची टोळी धुमाकूळ घालत आहे.


दरम्यान, त्यांच्या डब्यातील व पिशव्यातील खाद्यपदार्थांचा फडशा पाडतानांचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात एप्रिल 2024 मध्ये आयसीयूत उपचार घेत असलेल्या रुग्णाला उंदीर चावल्यानं त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळं अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता आरोग्य यंत्रणेनं हस्तक्षेप करून रुग्णालयामधील परिस्थिती हाताळून यंत्रणेला आवश्यक निर्देश देण्याची गरज आहे. यावर पेस्ट कंट्रोल आणि उंदीर मारण्याबाबत तातडीनं उपयोजना करण्याचे निर्देश देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.  शशिकांत शंभरकर यांनी दिली.


ससूनमध्ये उपचारासाठी आला आणि उंदराची शिकार झाला


यापूर्वी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्येच आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सागर रेणूसे असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. सागर रेणूसेचा भोर तालुक्यात अपघात झाला होता. 16 मार्चला त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आयसीयूमध्ये उपचार सुरु असताना 26 मार्चला त्याची प्रकृती खालावत होती. त्यानंतर नेमकं काय झालं याचा शोध घेतला असता उंदीर चावल्याचे समोर आले होते. आयसीयूमध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला होता. त्यात त्याचं निधन झाल्यावर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही वेळ डॉक्टरांनी नकार दिला. 


मात्र त्यानंतर डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावल्याच मान्य केलं. ऐरवी टून टून उड्या मारून घरात उच्छाद मांडणाऱ्या उंदरांना आपण बघितलंय. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयाततील रुग्णांच्या बेडवरचं जर उंदरांचा कळप धुमाकूळ घालत असेल तर काय म्हणावं? भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार बघून सर्व स्थरातून आता संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आता प्रशासन नेमकी काय खबरदारी घेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


हे ही वाचा