मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराड यांचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अशातच आता त्यांच्याच पक्षाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या एका वक्तव्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्य बाबत जी पक्षाची भूमिका राहील ती पक्षाची भूमिका जी अजित दादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य राहील, असे बाबासाहेब पाटील यांनी म्हटले. ते सोमवारी नांदेडमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी खंडोबाच्या माळेगावचे दर्शन घेतले. त्यानंतर माळेगाव यात्रेमध्ये त्यांनी फेरफटका मारला तसेच घोड्या व्यापाऱ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
वाल्मीक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येचे सूत्रधार असल्याचा आरोप विऱोधकांकडून केला जात आहे. कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. वाल्मीक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही, असे सांगितले जाते. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या प्रचाराची आणि इतर गोष्टींची सूत्रे वाल्मीक कराड यांनीच पडद्यामागून हलवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वाल्मीक कराड यांच्यावर आरोप झाल्यापासून धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे हे मंत्री असल्यामुळे वाल्मीक कराड यांना राजकीय संरक्षण मिळते. वाल्मीक कराड यांच्या इशाऱ्यावर बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा काम करते. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन दूर केल्याशिवाय वाल्मीक कराड यांच्यावर कारवाई शक्य नाही, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या सततच्या आरोपांमुळे महायुती सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचे सांगितले जाते.
वाल्मीक कराड पोलिसांसमोर सरेंडर करणार?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 21 दिवस उलटून गेल्यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये ठाण मांडून तपास करत आहेत. आतापर्यंत वाल्मीक कराड यांच्या अनेक निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय, त्यांचे बँक खातेही गोठवण्यात आले आहे. सर्व बाजूंनी कोंडी झाल्यामुळे वाल्मीक कराड कोणत्याही क्षणी पोलिसांना शरण जातील, अशी चर्चा आहे. वाल्मीक कराड हे सध्या महाराष्ट्रात की राज्याबाहेर आहेत, याबाबत माहिती नाही. त्यामुळे कराड आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सीआयडीला शरण जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आणखी वाचा
वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही