वाल्मिक कराडला न्याय मिळावा, केजमध्ये समर्थकाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. केज तालुक्यातील राजेगाव येथे पाण्याच्या टाकीवर चढून मागील तासाभरापासून आंदोलन सुरु आहे.
बीड : संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळं त्याचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. केज तालुक्यातील राजेगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीवर चढून मागील तासाभरापासून आंदोलन सुरु आहे. भगवान चौरे असं आंदोलकाचे नाव आहे. तर कराडला जाणून बुजून या संपूर्ण प्रकरणात गोवले जात असून या प्रकरणाची योग्य रीतीने चौकशी करून कराडला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप केला जातोय. याप्रकरणी त्याची चौकशी देखील सुरु आहे. यामुळं त्याचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरुन याप्रकरणाशी वाल्मिक कराडचा काही संबंध नसल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे राज्याच्या विविध भागातून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. हे आरोपी किती गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लक्षात येते. या गुन्हेगारांवर त्याचवेळी कारवाई केली असती तर या घटना घडल्या नसत्या. कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. या घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पकडले पाहिजे. तर या सर्वांना कुणी आसरा दिला त्यांचे कोणाशी बोलणे झाले, पैसे पाठवले त्या सर्वांना यात आरोपी करून अटक केली पाहिजे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले. वाल्मिक कराडच्या अनेक बेनामी संपत्ती सापडत आहेत. अनेक गुन्हे समोर येत आहेत. हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. व्यवस्थित रित्या घटनेचा तपास होत नाही. सीआयडी पथक नेमावे लागते, मध्येच एसआयटी पथक नेमावे लागते, काही अधिकारी निलंबित करावे लागतात, त्यांची बदली दुसरीकडे होते. नेमकं राज्यात काय चाललं आहे असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या: