Beed News: गेल्या दोन-तीन वर्षांपासून खंड पडलेला भगवान गडाच्या पायथ्याशी भरणारा दसरा मेळावा यावर्षी भरवला जाणार आहे. भगवान भक्तांच्या मनातील भावना लक्षात घेता, आणि भगवान भक्तांनी एकत्र यावे,' या उद्देशाने येत्या दसऱ्याला म्हणजेच 5 आक्टोबरला गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती भगवान गड दसरा मेळावा कृती समितीचे बाळासाहेब सानप व पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत दिली. तसेच या मेळाव्यात कोणतेही राजकीय भाषण होणार नसून, सांस्कृतिक आणि सामाजिक असा हा मेळावा असेल, असेही सानप म्हणाले. 


यावेळी बोलतांना सानप म्हणाले की, विजयादशमीच्या दिवशी विचारांचे सोने लुटण्यासाठी विखुरलेला समाज लाखोंच्या संख्येने गडावर हजर होत होता. मात्र, ही परंपरा काही कारणांमुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून खंडित झालेली आहे. मात्र येत्या पाच ऑक्टोबरला ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सानप यांनी दिली आहे. 


'नो पॉलिटिक्स' दसरा मेळावा


यावेळी पुढे बोलतांना सानप म्हणाले की, गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी घोषित केल्याप्रमाणे गडावर राजकीय भाषण होणार नाही. समितीच्या वतीने काणत्याही राजकीय नेत्याला निमंत्रित केले जाणार नाही. पण कुणी आलेच तर कोणत्याही राजकीय पक्षाचा व पक्ष नेतृत्वाचा उल्लेख केला जाणार नाही. ज्यांना यायचे, त्यांनी ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलावे, मेळाव्याला राजकीय स्वरूप राहणार नाही, असे सानप म्हणाले. 


स्पर्धेसाठी मेळावा नाहीच.. 


पंकजा मुंडे यांचा सुद्धा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मेळावा होतो, त्यामुळे हा मेळावा आयोजित केला जात आहे का? या प्रश्नाला उत्तर देतांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, पंकजा मुंडे यांच्या सावरगाव येथे होणाऱ्या मेळाव्याची वेळ काय आहे, हे पाहून आम्ही आमच्या या मेळाव्याची वेळ ठरवणार आहोत. त्यांच्या मेळाव्याला स्पर्धा म्हणून हा मेळावा नाही, असेही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: औरंगाबादकरांना 22 वर्षांनी मिळाले भूमरेंच्या रूपाने स्थानिक पालकमंत्री


गौप्यस्फोट! 'दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी दिला होता मुख्यमंत्र्यांना सल्ला'