Maharashtra Politics : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. बीड दौऱ्यावर आलेल्या प्रा. तानाजी सावंत यांनी विरोधकांना इशारा देताना खालच्या पातळीवर टीका केली. शिवसेनेसोबत (Shivsena) सावंत यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. 


शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरीनंतर 'निष्ठा यात्रा' सुरू केली आहे. आदित्य ठाकरेंच्या या 'निष्ठा यात्रे'च्या दौऱ्यात सातत्याने बंडखोरांना लक्ष्य केले जात आहे. त्याच्या प्रत्यु्त्तरात शिंदे गटाने 'हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा' सुरू केली आहे. या संपर्क यात्रेसाठी तानाजी सावंत बीडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. तानाजी सावंत यांनी म्हटले की, माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य सावंत यांनी केले. मुख्यमंत्र्यावर टीका करण्याअगोदर तुमचे चारित्र्य तपासा असं म्हणत सावंत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. 


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका 


ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातले, त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली असल्याची टीका मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. शिवसेनेच्या मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी हल्ली बाप पळवणारी टोळी आली असल्याचे टीका केली होती. त्यांच्या टीकेला सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे आम्हाला म्हणतात की तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका. पण, तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता, शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा थेट सवाल सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली असल्याचे सावंत यांनी म्हटले.


अचानक मराठा समाज जागा कसा झाला?


आमचं सरकार आले  आणि अचानक मराठे जागे कसे झाले असा प्रश्न उपस्थित करत तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच रद्द झाल्याचा आरोप केला. ज्या समितीला मराठा समाजाला  आरक्षण द्यायचे नव्हते, अशी समिती सरकारने स्थापन केली होती. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाला मिळणारं आरक्षण हे टिकाऊ आरक्षण हवं, अशी माझी भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटले.