(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News : चोरी केलेले दागिने 10 दिवसांनी मिळाले परत, घरासमोर दागिने ठेवून चोर पसार
Beed News : चोरी केलेले साडेचार तोळ्याचे दागिने दहा दिवसांनी घरासमोर ठेवून चोर पसार झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली.
Beed News : पोलिसांच्या (Police) तपासानंतर कुणाचे तरी चोरी झालेले दागिने परत मिळाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र, सोन्याचे दागिने चोरीला गेल्यानंतर दहाव्या दिवशी चोराने ते परत केल्याची घटना बीड (Beed) जिल्ह्यात घडली आहे. चोरी केलेले साडेचार तोळ्याचे दागिने तीन दिवसांनी घरासमोर ठेवून चोर पसार झाला आहे.
नातेवाईकाच्या घरी गेल्यावर घडली होती घटना
बीड जिल्ह्यातील पाडळसिंगीमध्ये राहणाऱ्या सविता काशीद (Savita Kashid) या त्यांच्या मामे बहिणीच्या लग्नासाठी बीडला नातेवाईकाकडे आल्या होत्या. त्यांची आते बहीण सुनीता यांच्या घरी त्या मुक्कामी होत्या. या दोघींच्या गळ्यातील गंठण हे कपाटात ठेवले होते. 27 तारखेला हे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. सविता काशीद आणि आणि सुनीता या दोघींनी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली होती.
पोलिसांनी खाक्या दाखवण्याच्या अगोदरच दागिने मिळाले परत
बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सगळीकडे शोधा शोध केली. मात्र, काही उपयोग झाला नाही. अखेर 10 दिवसानंतर सकाळी चमत्कार झाला आणि दोन्ही गंठण घरासमोर ठेवून चोर तिथून पसार झाला. पोलिसांनी खाक्या दाखवण्याच्या अगोदरच सविता काशीद यांना त्यांचे दागिने परत मिळाल्याने त्यांना सुखद धक्का बसला. प्रत्येक शहरामध्ये दररोज कुठे ना कुठे चोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. त्यानुसार पोलीस अतिशय गुप्त पद्धतीने तपास करतात. या प्रकरणात देखील पोलिसांना काही व्यक्तीवर संशय आला होता. त्यामुळं आपलं चोरीचं भिंग उघडं पडण्याच्या अगोदर दागिने चोरणाऱ्याने पोलिसी खाकीला घाबरून दागिने परत सविताताईंच्या घरासमोर आणून ठेवले.
पोलिसांनी सुरु केली होती संशयितांची चौकशी
फिर्यादी सविता काशीद (Savita Kashid) या लग्नासाठी नातेवाईकाकडे गेल्या होत्या. यावेळी त्यांनी नातेवाईकांकडे ठेवलेले दागिने चोरीला गेले होते. त्यानंतर या प्रकरणाची फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानंतर संशयितांची चौकशी सुरु केली होती. मात्र, त्याआधीच चोराने दागिने परत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी खाक्या दाखवण्याच्या अगोदरच सविता काशीद यांना त्यांचे दागिने परत मिळाल्याने त्यांना सुखद धक्का बसला. आपलं चोरीचं भिंग उघडं पडण्याच्या अगोदरच चोराने दागिने परत केले.
महत्त्वाच्या बातम्या: