Beed Crime News : धक्कादायक! शेतातून गेल्याचा राग आला; शाळकरी मुलाची हत्या करुन मृतदेह टांगले झाडाला
Beed Crime : पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून, त्याला बेदम मारहाण करून आधी त्याची हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली.
Beed Crime News : बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून, त्याला बेदम मारहाण करून आधी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका झाडाला टांगण्यात आला. ही घटना नित्रुड परिसरात मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम मोहम्मद मुर्तुजा शेख ( वय 15 वर्षे, रा.नित्रुड, ता. माजलगाव बीड) असं मृत मुलाचं नाव आहे. तर कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे असे आरोपींचे नावं आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील 15 वर्षीय गुलाम मोहम्मद इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. दरम्यान मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गुलाम मोहम्मद हा लहान बहीण सिमरन व छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन आजोबांच्या शेतात सरपण आणण्यासाठी गेला होता. दरम्यान याचवेळी कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी गुलाम मोहम्मदला रस्त्यात अडवलं. तसेच आमच्या शेतातून का जातोस असे म्हणत गुलाम याला बेदम मारहाण केली. एवढच नाही तर जमिनीवर पाडून मारहाण केली.
आमच्या शेतातून का जातो म्हणून गुलामला तिघांनी बेदम मारहाण केल्यानंतर, सरपणासाठी नेलेल्या ओढणीने तिघांनी गुलामचा गळा आवळला. त्यामुळे घाबरलेल्या गुलामची बहीण सिमरन आणि भाऊ हुजैफा यांनी पळ काढत घर गाठलं. तसेच घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे घरच्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी पालखी महामार्गावरील नित्रुडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात एका लिंबाच्या झाडाला गुलामचा मृतदेह लटकावलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान याची माहिती मिळताच, दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
पोलीस स्टेशन बाहेर मृताचे नातेवाईकांनी गर्दी!
मोहम्मद गुलामला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह एका झाडाला लटकवण्यात आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे माहिती मिळताच मोहम्मद गुलाम याच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुलाम याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: