(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांची एक तासापासून दगडफेक; सोळंकेंच्या बंगल्यामधून धुराचे लोळ
Maratha Reservation : अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर आक्रमक मराठा आंदोलकांकडून दगडफेक बंगल्याच्या आवारात प्रवेश करत आंदोलकांनी प्रकाश सोळंकेंच्या गाड्याही जाळल्या
Maratha Reservation : Beed : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या माजलगाव (Majalgaon) येथील घरावर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. मागील एक तासापासून दगडफेक होत आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यामधून धुराचे लोळ येत असल्याचं दिसत आहे.
आमदार प्रकाश सोळंकेंसोबत संपर्क साधण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केला. मात्र, गोंधळ एवढा होता की, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यानंतर मात्र प्रकाश सोळंकेंसोबत संपर्क झाला. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच, मराठा आंदोलकांना आवाहनही केलं. पाहुयात काय म्हणाले प्रकाश सोळंके?
मी मराठा समाजाचाच आमदार, आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा : आमदार प्रकाश सोळंके
आमदार प्रकाश सोळंके बोलताना म्हणाले की, "मी माजलगावमध्येच आहे. मी घरातच आहे. आज सकाळी अचानक काही आंदोलक माझ्या घरी आहे. माझ्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. घराचं, ऑफिसचं आणि गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. आपल्या माध्यमातून मी सर्व आंदोलकांना विनंती करणार आहे की, मी मराठा समाजाचाच आमदार आहे आणि माझाही मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आरक्षण मिळावं अशी माझीही मागणी आहे. काही राजकीय विरोधक असतात जे काही बाबतीत चिथावणी करु शकतात. माझा कोणत्याही आंदोलकांवर राग नाही, मी त्यांच्या भावना समजू शकतो की, त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे अशा बाबतीत राजकीय विरोधक संधी घेतात, असाच प्रकार याबाबतीत झाला असल्याचं मला वाटतं."
मला आंदोलकांशी बोलण्याची संधीच मिळाली नाही, थेट घरावर दगडफेक सुरू झाली : आमदार प्रकाश सोळंके
"मला आंदोलकांशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. माझ्या घरावर थेट दगडफेक करायला सुरुवात केली. कोणी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हतं. माझ्या घराला चारही बाजूंनी वेढा दिला. त्यामुळे चर्चा करण्याचा प्रश्नच आला नाही. मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की, माझाही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. मीसुद्धा मराठा समाजाचाच आमदार आहे. काहीजण अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हेच माझ्याबाबतीत घडलं आहे. सर्व आंदोलकांना माझी हात जोडून विनंती आहे, यांच्याच प्रेमाच्या जोरावर मी आमदार झालो आहेत. माझा मराठा समाजाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे.", असं प्रकाश सोळंके म्हणाले.