Auto Expo : राजधानी दिल्लीत सर्वात मोठा ऑटो एक्स्पो, पण अनेक मोठ्या ऑटो कंपन्यांनी फिरवली पाठ
Auto Expo : मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, किआ इंडिया, टोयोटा किर्लोस्कर आणि एमजी मोटर इंडिया सारख्या कंपन्या 13 जानेवारीपासून ग्रेटर नोएडा येथे होणाऱ्या मोटर शोमध्ये सहभागी होत आहेत.
Auto Expo : देशातील सर्वात मोठा मोटर शो ऑटो एक्स्पो 2023 जवळपास 3 वर्षांनंतर या आठवड्यात आयोजित केला जात आहे. कोरोना महामारीमुळे या द्वैवार्षिक वाहन मेळ्याचे आयोजन 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, यावेळी काही आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्या 'ऑटो एक्स्पो' घटक शोमध्ये सहभागी होत नाहीत. याची चर्चा ऑटो इंडस्ट्रीमध्ये होतीय.
मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, किआ इंडिया, टोयोटा किर्लोस्कर आणि एमजी मोटर इंडिया सारख्या कंपन्या 13 जानेवारीपासून ग्रेटर नोएडा येथे होणाऱ्या मोटर शोमध्ये सहभागी होत आहेत. यावेळी ऑटो एक्स्पो मोटर शोमध्ये पहिल्यांदाच 75 नवीन उत्पादनांचे लाँचिंग आणि अनावरणांसह 5 जागतिक ऑफर दिल्या जातील.
तुम्हीसुद्धा या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सहभागी होऊ शकता
ऑटो एक्स्पोच्या 16 व्या आवृत्तीची सुरुवात 11 जानेवारी आणि 12 जानेवारी रोजी 'प्रेस डे'ने होईल. हे प्रदर्शन 13 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) या वाहन कंपन्यांच्या संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 2020 ऑटो एक्स्पो आवृत्तीच्या तुलनेत यावेळी उद्योग सहभागींची संख्या अधिक असेल.
46 वाहन उत्पादक कंपन्यांसह सुमारे 80 उद्योग पक्ष मोटर शोमध्ये सहभागी होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी आणि इलेक्ट्रिक सेगमेंटकडे वाढता कल, यावेळी मोटार शोमध्ये मोठ्या संख्येने स्टार्टअप कंपन्यांचा सहभाग असेल. हे स्टार्टअप्स प्रामुख्याने इलेक्ट्रिक टू-व्हीलर, तीन चाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या उत्पादन क्षेत्रात आहेत.
'या' वाहन कंपन्यांची सहभागी होणार नाहीत
दर दोन वर्षांनी होणारा ऑटो एक्स्पो मोटर शो 2022 मध्ये होणार होता, परंतु कोविड महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन आणि निसान या लक्झरी वाहन कंपन्या मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडी या प्रदर्शनात दिसणार नाहीत. याशिवाय, Hero MotoCorp, Bajaj Auto आणि TVS मोटर कंपनी या आघाडीच्या दुचाकी उत्पादकांची उपस्थिती इथेनॉल पॅव्हेलियन (स्टॉल) मध्ये त्यांच्या 'फ्लेक्स फ्युएल' प्रोटोटाइप वाहनांच्या प्रदर्शनापुरती मर्यादित असेल.
सहभागी न होण्यामागे ऑटो कंपन्यांची कारणे
मोठ्या कंपन्यांच्या ऑटो एक्स्पोपासून अंतर ठेवण्याचे कारण सियामने दिलेले नाही. परंतू ऑटो फेअरमध्ये सहभागी न होणाऱ्या कंपन्यांनी शोच्या प्रासंगिकतेचा उल्लेख केला आहे. मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संतोष अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या प्रदर्शनात सहभागी होत आहोत. या एक्सोपला भेट देणाऱ्या ग्राहकांना आमच्यासारख्या लक्झरी ब्रँडमध्ये कमी रस असल्याचे आम्ही निरीक्षण केले आहे. यामुळे आम्ही जत्रेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. आम्ही ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी अधिक मार्गांचा अवलंब करणार आहोत. आम्हाला मोटर शो कार्यक्रमापेक्षा ग्राहकांच्या फीडबॅकवर अधिक गुंतवणूक करायची आहे असं अय्यर यांनी सांगितलं
कंपनीने भारतात आपली उत्पादने लॉन्च करण्याच्या टाइमलाइनवर टिकून राहण्याचा अंतर्गत निर्णय घेतला आहे असं पीटर साल्क, स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर यांनी म्हटलं आहे. अशा स्थितीत आम्ही वाहन प्रदर्शनात सहभागी होत नाही. यापूर्वी अनेक वाहन कंपन्यांनी स्थळाचे अंतर आणि सहभागासाठी जास्त खर्च यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाहन प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये अशोक लेलँड, व्होल्वो आयशर कमर्शियल व्हेइकल्स, जेबीएम ऑटो, एस एम एल इसुझू, कमिन्स, कीवे आणि सन मोबिलिटी यांचा समावेश आहे.