Aurangabad News : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या महिलेवर काळाचा घाला; अपघातात गमावला जीव
Mumbai Dasara Melava 2022 : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या महिलेवर काळाचा घाला. मेळाव्याहून घरी परतताना महिलेनं अपघातात जीव गमावला आहे.
Mumbai Dasara Melava 2022 : मुंबई (Mumbai) येथील दसरा मेळाव्याहून (Dasara Melava News) गावाकडे परतणाऱ्या महिलेला भरधाव कारनं दिलेल्या धडकेत महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील जरुळ फाटा येथे घडली. मात्र घटना घडताच कारचालकाने (Accident News) घटनास्थळावरून धूम ठोकली. कमळाबाई देवाजी पाठक (वय 75 वर्षे रा. डिग्रस ता. सिल्लोड) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बदिलीप भिवसन पाठक हे सिल्लोड (Sillod) तालुक्यातील डिग्रस येथील रहिवासी आहेत. ते आपल्या काकू कमळाबाई पाठक व इतर नातलग आणि गावातील लोकांसह मुंबई येथे आयोजित दसऱ्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला गेले होते. बुधवारी कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ते एसटी बसने गावाकडे परत निघाले. गुरुवारी सकाळी साडे पाच वाजता सुमारास परतीच्या प्रवासादरम्यान बस तालुक्यातील जरुळ फाटा येथे एका हॉटेलवर थांबली. प्रवासी लघुशंका करण्यासाठी खाली उतरले. यावेळी रस्त्याच्या एका बाजूला पुरुष तर दुसऱ्या बाजूला महिला गेल्या. दरम्यान रस्ता ओलांडतांना कमळाबाई यांना वैजापूरहुन शिऊरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच दिलीप पाठक यांनी सहप्रवाशांसोबत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातग्रस्त महिला या त्यांच्या काकू कमळाबाई या असल्याचे त्यांना दिसून आले. तत्काळ त्यांना जखमी अवस्थेत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दिलीप पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेदरकार वाहन चालवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी फरार कारचालकाविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका घटनेत वैजापूर (Vaijapur) हद्दीत मेळावा आयकून परतणाऱ्या वृद्धाने वैजापूर धरणात उडी घेतल्याचे समोर आले आहे. रात्रीपासून पोलीस आणि स्थानिक प्रशासन या व्यक्तीचा शोध घेत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील हे वृद्ध असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :