ना बॉडीगार्ड, ना लवाजमा, IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा; पत्नीसह केंद्रेकर आठवडी बाजारात
अधिकारी म्हटलं की नेहमी एसी कार्यालय, अलिशान गाड्या, हाताखाली नोकर-चाकर असे चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. मात्र औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठवडी बाजारात जाऊन स्वतः बाजार केला. त्यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
औरंगाबाद : आपल्या साधेपणामुळे ओळखले जाणारे सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आठवडी बाजारात जाऊन स्वतः बाजार केला. इतकंच नाही जर खरेदी केल्यानंतर पिशवी खांद्यावर घेऊन ते निघाले. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुनील केंद्रेकर हे औरंगाबादचे विभागीय आयुक्त आहेत.
अधिकारी म्हटलं की नेहमी एसी कार्यालय, अलिशान गाड्या, हाताखाली नोकर-चाकर असे चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नाही तर तलाठी सुद्धा बाजरात गेले तर सोबत पिशवी पकडण्यासाठी कोतवाल असल्याचं अनेकदा पाहायला मिळतात. मात्र असे असतानाही केंद्रेकर यांच्यासारखे अधिकारी किंचितवेळा पाहायला मिळतात.
शेतकरी कुटुंबातील केंद्रकर हे नेहमी आपल्या कडक शिस्तीच्या आणि सामान्यांसाठी निर्णय घेणारे अधिकारी म्हणून चर्चेत असतात. त्यामुळे त्यांची नेहमीच चर्चा असते. आता आठवडी बाजारात पत्नीसोबत बाजार करतानाचे त्यांचे फोटो समोर आले आहेत. ज्यात बाजाराची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेताना केंद्रेकर दिसत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील बाजारातील हे फोटो आहे. आज (16 जानेवारी) सकाळी केंद्रकर खुलताबाद येथे गेले असताना त्यांना बाजार दिसला आणि त्यांनी पत्नीसोबत बाजार केला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत कोणताही सुरक्षारक्षक सुद्धा नव्हता. त्यामुळे केंद्रेकर यांचा पुन्हा एकदा साधेपणा समोर आला आहे.