काय सांगता! चक्क आमदाराच्या घरी चोरट्यांचा डल्ला, हिंगोली जिल्ह्यातील घटना
Hingoli News: विशेष म्हणजे चोरट्यांनी इतर चार ठिकाणी देखील चोरीचा प्रयत्न केला असल्याचे समोर आलंय.
Hingoli News: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांच्या औरंगाबादच्या निवास्थानी चोरीची घटना ताजी असतानाच, आता हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मुटकुळे यांच्या आडगाव येथील घराचे कुलूप तोडून आतमधील कागदपत्रे व साहित्य फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी इतर चार ठिकाणी देखील चोरीचा प्रयत्न केला असल्याचे समोर आलंय. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार मुटकुळे यांचे आडगाव मुटकुळे हे गाव आहे. काही दिवसांपूर्वी या गावात त्यांनी नवीन घराचे बांधकाम केले. नवीन घर बांधले असले तरीही त्यांचे कुटुंबीय जुन्या घरीच राहतात. दरम्यान 18 डिसेंबरला आडगावात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावात प्रवेश केला. गावात आलेल्या चोरट्यांनी आमदार मुटकुळे यांच्या नवीन घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून कागदपत्रे व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. नवीन घर असल्याने त्या ठिकाणी कोणी सद्या राहत नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
शेळीचे दोन पिल्ले लंपास...
आमदारांच्या घरात काहीच हाती न लागल्याने चोरट्यांनी गावातील इतर ठिकाणी मोर्चा वळवला. यावेळी गावातील ज्ञानबा नवसाजी मुटकुळे, भाऊराव किसनराव मुटकुळे, नारायण सखाराम मुटकुळे यांच्या घरी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण येथेही डाव फसला आणि चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. पुढे चोरटे भागवत पुंजाजी खोरणे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेले शेळीचे दोन पिल्ले घेऊन फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तर याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार तान्हाजी मुटकुळे अधिवेशनात
गावात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी रविवारी गावात मतदानाचा हक्क बजावला. मात्र हिवाळी अधिवेशन असल्याने ते नागपूरला रवाना झाले. मात्र नागपूरला गेल्यावर रात्री आपल्या घरात चोरी झाली असल्याची माहिती त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी मिळाली. त्यामुळे याप्रकरणी त्यांचा मुलगा शिवाजी तान्हाजी मुटकुळे यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरात भीतीचे वातावरण...
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना समोर येतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता तर थेट आमदार यांच्या घरीच चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. तर गावात आणि परिसरात सद्या भीतीचे वातावरण आहे. तर आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.