Shahajibapu Patil: मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात परतणारे रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरवल्याने खुर्च्या खाली असल्याचे समोर आले आहे. यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आमदाराने रोजचं पन्नास हजार लोकं जमा करायला हवे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 


भुमरे यांच्या कार्यक्रमात गर्दी झाली नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना शहाजीबापू पाटील म्हणाले की, मी तालुक्यात फिरायला लागलो, कुठेतरी एखाद्यावेळी पाच-पन्नास माणसं घेऊन बसलो म्हणजे माझा कार्यक्रम पार पडला होते का?, दररोजचं तुम्हाला पन्नास हजार माणसं गोळा करायची का? असा प्रश्न शहाजीबापू यांनी उपस्थित केला आहे. तर आमदार आहेत ते मतदारसंघात आहेत, दोन माणसांजवळ सुद्धा बसावे लागणार आहे,पन्नास माणसात सुद्धा बसावे लागणार आहे आणि दहा हजार माणसात पण बसावे लागणार आहे. त्याचे फोटो काढून तुम्ही असं करून नका. आमदारांना मतदारसंघात दररोज गर्दी पाहिजे असा काही भाग नाही. मात्र त्यांचे काम मतदारसंघात आहे की नाही हे महत्वाचे असल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले. 


भुमरेंचा व्हिडिओ व्हायरल...


संदिपान भुमरे शनिवारी आपल्या पैठण मतदारसंघात मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच परतले होते. त्यामुळे पैठण शहरात आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या कार्यक्रमाची मोठी चर्चा होती. पण प्रत्यक्षात त्यांच्या या कार्यक्रमाकडे नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी पाठ फिरवली. त्यामुळे कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या खुर्च्या खालीच होत्या. याच खाली खुर्च्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्वीट करत भुमरे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 


गद्दारी केल्यामुळेचं शिवसैनिकांनी पाठ फिरवली


भुमरे यांच्या खाली खुर्च्याचा व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर यावर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, संदिपान भुमरे मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच पैठण शहरात आले. त्यांनी जो कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाला मुळीच लोकं नव्हते. सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. पैठण शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आणि गद्दारी केल्यामुळे भुमरे यांच्या कार्यक्रमाकडे नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी पाठ फिरवली असल्याचं स्पष्ट होत असल्याचं दानवे म्हणाले आहे.  


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: मंत्री झाल्यावर मतदारसंघात परतलेल्या भुमरेंच्या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली; दानवेंकडून व्हिडिओ ट्वीट


Aurangabad: उद्धवसेनेचे दोन आमदार फुटणार; रोहयो मंत्री संदिपान भुमरेंचा दावा