Aurangabad News: शिंदे सरकारमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता मंत्री झालेले आमदार आपापल्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान शिंदे गटातील आमदार तथा राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात परतले. मात्र त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचा दावा शिवसेना आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी याबाबत एका व्हिडिओ सुद्धा ट्वीट केला आहे. 


दानवे यांनी व्हिडिओ ट्वीट करत म्हटले आहे की, सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी 'देश भ्रमंती' करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती, असा टोला दानवे यांनी लगावला आहे. 






शिवसैनिक फिरकलेच नाही...


दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुमरे हे पहिल्यांदाचं पैठण शहरात आले होते. यावेळी त्यांचा स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांच्यावतीने सत्कार सुद्धा ठेवण्यात आला होता. मात्र यावेळी शिवसैनिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी भुमरे यांचे मोजकेच समर्थक पाहायला मिळाले. तर मोठ्याप्रमाणावर खुर्च्या खाली असल्याचे सुद्धा दिसून आले. त्यामुळे पैठण तालुक्यात याची चर्चा पाहायला मिळत असून, कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


भुमरेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी घेतली होती सभा...


शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भुमरे यांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली होती. यावेळी आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे आदित्य यांनी त्यावेळी काढलेल्या शिवसंवाद यात्रेतील सर्वाधिक गर्दी भुमरे यांच्या मतदारसंघातचं झाली असल्याचं बोलले जात होते. 


महत्वाच्या बातम्या...


अलविदा! 'जीवन खूप सुंदर आहे,पण मला कंटाळा आलाय'; सुसाईड नोट लिहून विद्यार्थिनीने संपवलं जीवन


मोठी बातमी: हायवाच्या धडकेत तिघांचा मृत्यू; औरंगाबादच्या बिडकीन-शेकटा रोडवरील घटना