Aurangabad News : औरंगाबाद येथे सुरु असलेल्या अग्निवीर (Agniveer) सैन्य भरतीसाठी विविध जिल्ह्यातून तरुण शहरात येत आहेत. विशेष म्हणजे हजारो विद्यार्थी हे रेल्वेने प्रवास करून शहरात दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याचवेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून अग्निवीर सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची मोठी लुट केली जात असल्याचा आरोप होत आहे. चुकीचे तिकीट असल्याचे सांगून त्यांच्याकडून रेल्वेचे अधिकारी मोठी लुट करत असल्याचा आरोप होत असून, याप्रकरणी एक तथाकथित व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याप्रकरणी अजय धनजे नावाच्या तरुणाने एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. ज्यात त्याने दावा केला आहे की, औरंगाबादमध्ये अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून चुकीचे तिकीट काढून रेल्वेने प्रवास केल्याचे सांगून पैसे उकळले जात आहे. जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू आणि तुम्ही कधीही सरकारी नोकरीसाठी पात्र होणार नाही, अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.
तर आमच्या मित्रांकडून प्रति व्यक्ती 200 रुपये घेतले गेले आणि पावती दिली गेली नाही. वरून रेल्वेचे तिकिटेही काढायला लावले. आमच्याकडे त्या तिकिटाचे फोटो आहेत. किमान 2000 ते 2500 रुपये घेतले. अशा अधिकाऱ्यांची चौकशी करा. त्या अधिकाऱ्यांची नावे आम्हाला माहीत नाहीत. कोण चूक कोण बरोबर हे मला माहीत नाही. त्या भावी जवानांकडून घेतलेले पैसे कोणाच्या खिशात गेले? गुन्हा किती गंभीर आहेत? असे म्हणत राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी न्याय द्यावे, आम्ही विद्यार्थी तुमच्याकडूनच अपेक्षा करतो, असेही ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
व्हिडिओ केला पोस्ट...
या तरुणाने पोस्ट केलेल्या तथाकथित व्हिडिओमध्ये कुणीही दिसत नसून, आवाज मात्र आयुकू येत आहे. ज्यात एक महिला पैश्याची मागणी करत आहे. तसेच कॅश नाही म्हणणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची सांगत आहे. तिथे गेल्यावर पैसे निघतात असेही म्हणत आहे. तर हे संभाषण कुणाचे आहे आणि तरुणाने केलेल्या दाव्यात कितपत सत्यता आहे याची चौकशी होण्याची मागणी केली जात आहे.
Aurangabad: अग्निवीरच्या भरतीसाठी आलेला तरुण मैदानातच चक्कर येऊन कोसळला; उपचारादरम्यान मृत्यू
रेल्वे विभागाचं उत्तर
अजय धनजे नावाच्या तरुणाने ट्वीट केल्यावर त्याच्या ट्वीटला रेल्वे विभागाकडून उत्तर देण्यात आले आहे. ज्यात म्हटले आहे की, गैरसोयीबद्दल क्षमस्व. सर, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमचा प्रवास तपशील (PNR/UTS Number) आणि मोबाईल नंबर आमच्याशी DM द्वारे शेअर करा. जलद निवारणासाठी तुम्ही तुमची तक्रार/समस्या थेट https://railmadad.indianrailways.gov.in वर नोंदवू शकता, असे उत्तर रेल्वे विभागाने दिले आहे.