(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायचं होणार?
OBC Reservation: औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीचा कायर्क्रम 13 जुलैला होणार.
Aurangabad News: ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नसल्याचा दावा सर्वच पक्षातील नेतेमंडळी करत आहे. मात्र प्रत्यक्षात या निवडणुका आरक्षणाशिवायचं होणार असल्याचे चित्र आहे. कारण निवडणूक आयोगाने या निवडणुकीची तयारी सुरु केली असून, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीचा कायर्क्रम जाहीर केला. 13 जुलैला गण आणि गटाची आरक्षण सोडत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सात तालुक्यातील 8 जिल्हा परिषदेचे तर पंचायत समितीचे 16 गण वाढले आहेत. ज्यात सिल्लोड, औरंगाबाद, फुलंब्री, पैठण, वैजापूर, कन्नड आणि गंगापूर तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे यापूर्वी असलेल्या जिल्हा परिषदेच्या 62 गटाचे आता 70 गट झाले आहेत. तर पंचायत समिती सदस्य संख्या 124 वरून 140 झाली आहे. त्यादृष्टीने अनुसूचित जाती (महिला) अनुसूचित जमाती (महिला) सर्वसाधारण महिला याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी 13 जुलैला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
असा असेल सोडत कार्यक्रम...
- गण आणि गटाची आरक्षणाची सोडत : 13 जुलै.
- आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे : 15 जुलै.
- हरकती व सूचना सादर करणे : 15 ते 21 जुलै.
- हरकती व सूचना अभिप्रायासह आयोगाकडे सादर करणे : 25 जुलै.
- हरकती व सूचना नंतर आरक्षणास मान्यता देणे : 29 जुलै.
- आरक्षण अंतिम करणे : 02 ऑगस्ट.
विरोध होण्याची शक्यता...
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी सर्वच पक्षातून केली जात आहे. त्यामुळे यासाठी राज्य सरकारकडून कायदेशीर लढा दिला जात होता. मात्र आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे या सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर न्यायालयात लढा देऊन ओबीसी आरक्षण मिळवून देण्याची मागणी होत आहे. तर ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.