Aurangabad: औरंगाबादकरांनो 'पाणी टंचाई'नंतर आता 'इंधन टंचाई'ची तयारी ठेवा; कारण...
Fuel Shortage: कंपनीला ऑर्डर दिल्यावर पंपचालकांना पाचव्या दिवशी पेट्रोल-डीझेल मिळत असल्याचे चित्र आहे.
Aurangabad News: औरंगाबाद शहर पाणी टंचाईमुळे चर्चेत आले असतानाच आता शहरात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ऑइल कंपनीला ऑर्डर दिल्यावर पंपचालकांना पाचव्या दिवशी इंधन मिळत आहे. त्यामुळे अनेक पंपचालकांना आठवड्यात दोनदा-तीनदा काही तासांसाठी बंद ठेवण्याची वेळ येत आहे.
आता पंपचालकांसाठी कोटा निश्चित...
इंधन टंचाईमुळे यावर काहीतरी मार्ग काढण्याची मागणी पंपचालक करत असताना, तोडगा काढण्याचा सोडा कंपनीने आणखी अडचणीत भर घातली आहे. कारण ऑइल कंपन्यांनी पंपचालकांसाठी कोटा निश्चितीचा नवीन नियम अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच 25 टक्केपेक्षा अधिक पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठा कमी करण्यात येत आहे. त्यात आता कोटा निश्चित केल्यास आगामी काळात शहरात कृत्रिम टंचाई भासण्याची शक्यता आहे.
नो स्टॉकचा बोर्ड...
पेट्रोल, डिझेलचा पुरवठा कमी झाल्याने अनेक पेट्रोल पंपचालकांवर नो स्टॉकचा बोर्ड लावण्याची वेळ आली आहे. ऑइल कंपनीकडून पंपावरील पेट्रोल आणि डिझेलची विक्रीची ऑनलाइन महिती घेतली जाते. यामुळे कोणत्या पंपावर किती इंधन लागते याचा कोटा निश्चित केला जात आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या हा नियम लागू करण्यात आला असून, लवकरच औरंगाबादमध्ये सुद्धा लागू होणार आहे. त्यामुळे औरंगाबादकरांनी पाणी टंचाईसोबतच इंधन टंचाईची सुद्धा तयारी ठेवावी.
राज्यातील इतर शहरातील दर काय?
राज्यात पुण्यात पेट्रोलचा दर 110.88 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोल 111.08 रुपये आणि डिझेल 95.59 रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 112.97 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर 98.89 रुपये प्रति लिटर इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 111.74 रुपये आणि डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 111.44 रुपये आणि डिझेलसाठी 95.94 रुपये मोजावे लागणार आहे. राज्यात पेट्रोलचा सर्वाधिक दर परभणीत आहे. परभणीत एक लिटर पेट्रोलचा दर 114.38 रुपये इतका असून डिझेलचा दर 98.74 रुपये प्रति लिटर आहे.