Aurangabad Rain Update: पावसाने पाठ फिरवली, पेरण्याही खोळंबल्या; शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
Rain Update: जूनचा अर्धा महिना संपला असताना सुद्धा अजूनही पेरणीयोग्य पाऊस पडलाच नाही.
Rain Update: मृग नक्षत्राच्या सुरवातीला आलेल्या पावसाने आता पूर्णपणे पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. सुरवातीला काही भागात सोडले तर अजूनही अनेक भागात मोठा पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले असून, खरिपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात काही भागात सुरवातीला दमदार पाऊस झाला. मात्र त्यांनतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. तर परभणी जिल्ह्यात अजूनही मान्सूनचा पाऊस दाखल झाला नाही. तर 1 जूनपासून आजपर्यंत 6.92 मिलिमीटर पाउस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली दमदार पाऊस झालाच तर पेरण्या करता येणार आहे.
दुबार पेरणीचे संकट...
औरंगाबादसह जालना आणि बीड जिल्ह्यात सुरवातीला दमदार पाऊस झाला होता. तर पावसाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र आता पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार असल्याचे चित्र आहे.
कर्जही मिळेना...
एकीकडे पावसाने दगा दिला आहे,तर दुसरीकडे पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बँकेच्या खेट्या माराव्या लागत आहे. मराठवाडा विभागात13 जूनपर्यंत विभागात फक्त 22. 38 टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. मराठवाड्यात 10 हजार 804 कोटीचे उदिष्ट आहे. मात्र 13 जूनपर्यंतची आकडेवारी पाहिली असता 2 हजार 418 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत सापडला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती कर्जवाटप...
औरंगाबाद जिल्ह्यात 387.19 कोटी रुपये (28.58), लातूर जिल्ह्यात 254.87 कोटी रुपये ( 15.28 टक्के), उस्मानाबाद 363.96 कोटी (26.60 टक्के), बीड 359.03 कोटी (20.40 टक्के), नांदेड 435.25 कोटी ( 28.66 टक्के), जालना 259.70 कोटी (21.29 टक्के), परभणी 214.78 कोटी (19.43 टक्के), हिंगोली 143.71 (22.38 टक्के) एवढं कर्जवाटप करण्यात आले आहे.