Aurangabad: ठाकरे गटाविरोधात शिंदे गटाने दंड थोपटले; युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी तिघांची नियुक्ती
Aurangabad News: शिंदे गटाचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
Aurangabad News: शिवसेनेत (ShivSena) झालेल्या बंडखोरीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सर्वाधिक मोठा धक्का औरंगाबादमध्ये बसला आहे. कारण शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) सर्वाधिक शिवसेनेचे आमदार हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. अशात आता शिंदे गटाने आपला पक्ष बळकट करण्यासाठी युवा सेनेचा विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान शिंदे गटाच्या युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी नव्याने तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना नवीन पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. ज्यात युवा सेनच्या जिल्हाप्रमुखपदी शेखर अप्पासाहेब जाधव, सचिन देवीदास मिसाळ आणि काकासाहेब बाबासाहेब टेके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तिन्ही जिल्हाप्रमुख यांचे कार्यक्षेत्र वेगळे असणार आहे. आगमी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्या समोर ठेवून शिंदे गटाकडून या नियुक्त्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी पडलेल्या उभ्या फुटीनंतर झालेल्या या नियुक्त्या महत्वाच्या समजल्या जात आहे.
आमदार जैस्वालांच्या मुलाला डावलले?
औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटाच्या युवा सेना जिल्हाप्रमुखपदी तिघांची नियुक्ती करण्यात आली असतानाच, आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषीकेश जैस्वाल यांना मात्र नवीन कार्यकारिणीत संधी देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे ऋषीकेश जैस्वाल हे सुरुवातीपासून युवा सेनेत कार्यरत आहेत. काही वर्षांपासून त्यांच्याकडे विद्यापीठ कक्षप्रमुख अशी जबाबदारी होती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ते आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासोबत शिंदे गटात म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले. त्यामुळे आता त्यांची युवा सेनेत जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र त्यांना संधी न मिळाल्याने चर्चेला उधान आले आहेत.
नवीन जिल्हाप्रमुखांचे कार्यक्षेत्र
- जिल्हाप्रमुख शेखर जैस्वाल यांच्याकडे औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- जिल्हाप्रमुख सचिन मिसाळ यांच्याकडे गंगापूर, कन्नड आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- जिल्हाप्रमुख काकासाहेब टेके यांच्याकडे पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
काय सांगता! लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने शेतकरी पुत्राचा थेट आमदाराला फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल