Aurangabad: अग्निवीरच्या भरतीसाठी आलेला तरुण मैदानातच चक्कर येऊन कोसळला; उपचारादरम्यान मृत्यू
Aurangabad: मृत्यू झालेला तरुण गेली 6 वर्षे सतत सैन्य भरतीची तयारी करत होता.
Aurangabad News: औरंगाबाद येथे सुरु असलेल्या अग्निवीर सैन्य भरतीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली आहे. अग्निवीर योजने अंतर्गत शहरात होत असलेल्या भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी कन्नड तालुक्यातील हा तरुण शहरात आला होता. सोळाशे मिटरचा फेरा पूर्ण करत असतांना तो चक्कर येऊन कोसळला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील करण नामदेव पवार( वय 20) हा अग्निवीर योजने अंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी औरंगाबादला आला होता. काल रात्री 1 वाजता 1600 मिटर रनिंग करताना शेवटचा राउंड काढत असतांना तो चक्कर येवून पडला. त्यामुळे त्याला शासकीय घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले होते. तर त्याच्यावर उपचार चालू असतांना आज दुपारी त्याचे निधन झाले आहे.
सहा महिन्यापूर्वी आईचं निधन..
करण यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. आई सतत आजारी राहत असल्याने स्वतः स्वयंपाक करून आई आणि भावाला जेवू घालत होता. दरम्यान सहा महिन्यापूर्वी त्याच्या आईचं निधन झाले. आपण सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करावी अशी त्याची इच्छा होती. तर गेली 6 वर्षे तो सतत यासाठी सराव करत होता. देशासाठीच प्राण गेले तर बरे होईल असं नेहमी तो आपल्या मित्रांना सांगत होता.
नातेवाईकांची गर्दी...
करण काल रात्री चक्कर येऊन पडल्याची माहिती मिळताच त्याचे जवळचे नातेवाईक कन्नडहून औरंगाबादमध्ये आले होते. मात्र आज दुपारी त्याच्या निधनाची माहिती मिळताच इतर नातेवाईक आणि मित्रपरिवार घाटी रुग्णालयात आल्याचे पाहायला मिळाले. सैन्यात भरती होण्याची करणची खूप इच्छा होती. त्यासाठी गेली अनेक दिवस तो सराव करत होता. आधी आई आणि आता करणच्या निधनानंतर त्याचा भाऊ एकटा पडला आहे.