लिहून घ्या! संजय राऊत असेपर्यंत शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार नाही; संजय शिरसाटांचा मोठा दावा
Sanjay Shirsat: जोपर्यंत संजय राऊत आहेत तोपर्यंत शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार नाही, हे माझ्याकडून लिहून घ्या' असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
Sanjay Shirsat: शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कौतुक करण्यात आल्याने आणि त्यांनी केलेल्या एका विधानाने शिंदे-ठाकरे गट (Shinde-Thackeray Group) पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागल्या आहे. पण यावरच बोलतांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मात्र मोठं विधान केले आहेत. 'जोपर्यंत संजय राऊत आहेत तोपर्यंत शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार नाही, हे माझ्याकडून लिहून घ्या' असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
दीपक केसरकर यांच्या विधानानंतर शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नाला उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, दीपक केसरकर हे सॉफ्ट प्रवक्ते असून, भांडण नको असे त्यांची आजही भूमिका आहे. ते अहिंसावादी नेते आहेत. परंतु त्यांना माहीत नाही की, संजय राऊत यांना एकत्र येऊ देणार नाही. जोपर्यंत संजय राऊत आहेत तोपर्यंत शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार नाहीत हे माझ्याकडून लिहून घ्या असा दावा शिरसाट यांनी केला. तर आम्ही त्याचवेळी एकत्र येऊ शकत होतो, पण ती वेळ आता निघून गेली आहे. तसेच आज जर ठाकरे गटाची ऑफर आली तर याचा योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे घेतील असेही शिरसाट म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला पोलादपूरच्या कशेडी घाटात टँकरने मागून धडक दिल्यानं अपघात झाला. दरम्यान यावर बोलतांना शिरसाट यांनी देखील या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. अपघाताचा घटनाक्रम पाहिल्यास कदम यांच्या गाडीच्या मागे असलेल्या पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करून ट्रक हा कदम यांच्या गाडीला धडक देऊन पुढे निघून गेला. त्यामुळे असा अपघात करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर याची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली पाहिजे. तसेच स्थानिक राजकारणाबद्दल मी सांगू शकत नाही, पण योगेश कदम यांना अनेक वेळा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या माध्यमातून धमक्या आल्याचं शिरसाट म्हणाले. त्यामुळे शंकेची पाल तिकडे जाते असेही शिरसाट म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर टीका
दरम्यान याचवेळी बोलतांना शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊत यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहे. आम्ही आजही उद्धव ठाकरेंना उद्धव साहेब म्हणतो. त्यांच्या भाषेत आम्ही गद्दारी केली असेल, पण आम्ही त्यांचा अपमान केला नाही. आम्ही नेहमीच त्यांचा आदर केला. मात्र हा माणूस पूर्वीपासून लूजटॉक करायचा असा टोला शिरसाट यांनी राऊत यांना लगावला. संजय राऊत उद्धव ठाकरेंचा उल्लेख एकेरी करायचे. त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या त्या कॅमेरासमोर सांगू शकत नाही. अत्यंत चुकीच्या कमेंट केल्या आहेत. सगळ्या ठाकरे फॅमिलीविषयी स्टेटमेंट होती. 'ओ कुछ नही,वो कुछ नही असं' म्हणत आदित्य ठाकरे यांना ग्राह्य धरत नव्हते असाही आरोप शिरसाट यांनी राऊत यांच्यावर केला.