SSC-HSC Exam: आता दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद; अशी असणार बैठक व्यवस्था
SSC-HSC Exam: फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या या परीक्षा सन 2020 पूर्वी जशा घेतल्या होत्या, त्या पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
SSC-HSC Exam: फेब्रुवारी (February) आणि मार्च (March) महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी (SSC-HSC Exam) परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व अन्य पूर्ण तयारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. तर यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर (Home Center) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा तेथे केंद्र (होम सेंटर) असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या या परीक्षा सन 2020 पूर्वी जशा घेतल्या होत्या, त्या पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत यंदा बारावी परीक्षेसाठी 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यांची 430 परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तर दहावी परीक्षेसाठी 1 लाख 80 हजार 210 विद्यार्थी परीक्षा देणार असून, 629 परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षेत करण्यात आलेले बदल...
कोरोना प्रादुर्भावामुळे 2021 मध्ये दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढे 2022 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम होता. त्यामुळे विशेष निर्णय घेऊन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. ज्यात शाळा तेथे केंद्र (होम सेंटर), 25 टक्के कमी अभ्यासक्रम, याशिवाय उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात आला होता. मात्र यावेळी होम सेंटर रद्द करण्यात आले आहे, 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे, तसेच अधिकचा वेळ देखील मिळणार नाही.
बारावी परीक्षेची स्थिती!
जिल्हा | कॉलेज | परीक्षा केंद्र | विद्यार्थी संख्या |
औरंगाबाद | 470 | 157 | 60 हजार 400 |
बीड | 298 | 101 | 38 हजार 929 |
परभणी | 233 | 059 | 24 हजार 366 |
जालना | 239 | 080 | 31 हजार 127 |
हिंगोली | 120 | 033 | 13 हजार 441 |
दहावी परीक्षेची स्थिती!
जिल्हा | शाळा | परीक्षा केंद्र | विध्यार्थी संख्या |
औरंगाबाद | 906 | 227 | 64 हजार 593 |
बीड | 652 | 156 | 41 हजार 521 |
परभणी | 438 | 093 | 27 हजार 800 |
जालना | 397 | 100 | 30 हजार 676 |
हिंगोली | 221 | 053 | 15 हजार 620 |
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI