(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: नामांतराला राष्ट्रवादीकडून होणाऱ्या विरोधाबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी: शिरसाट
Aurangabad: नामांतराचा निर्णय होत असतांना राष्ट्रवादीकडून खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.
Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर या याचिकाकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी अहमद मुस्ताक यांचा सुद्धा समावेश आहे. यावरूनच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीकडून संभाजीनगरला विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे असं शिरसाट म्हणाले आहे.
काय म्हणाले शिरसाट...
यावेळी बोलतांना शिरसाट म्हणाले की, कालच मला कळाले की, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने संभाजीनगरच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संभाजीनगरचा प्रश्न सर्वांच्याच जिव्हाळाचा विषय असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलेलं ते नाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता यात काही राष्ट्रवादीच्या लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. हीच राष्ट्रवादी ज्यांच्यामुळे आम्ही उठाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझा थेट प्रश्न आहे की, राष्ट्रवादीने संभाजीनगरला विरोध केला असून, तुमची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा. तर संभाजी महाराजांचे नाव या शहराला नको का? असा प्रश्नही शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.
खैरे म्हणतात जयंत पाटलांना भेटणार...
राष्ट्रवादीचे पदाधिकारी अहमद मुस्ताक यांच्याकडून उच्च न्यायालयात नामांतराच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकाबाबत चंद्रकांत खैरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उच्च न्यायालयात याचिका करणारा हा तोच व्यक्ती आहे ज्यांनी, यापूर्वी देखील औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे मी जयंत पाटील यांची भेट घेऊन, राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याला आवर घाला म्हणून मागणी करणार असल्याचं खैरे म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad : औरंगाबादच्या नामांतराचा वाद उच्च न्यायालयात, याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी