Politics: 'लोकांना मिरची लागेल अशा पोस्ट सोडा'; भूमरेंचा 'तो' फोन कॉल व्हायरल
Aurangabad News: भुमरे यांची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Maharashtra Political Crisis: कधीकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट तयार केला आहे. दरम्यान हे सर्व आमदार आधी सुरत, गुवाहाटी आणि त्यांनतर गोव्यात शिफ्ट झाले. पण असे असताना सर्वच आमदार फोनवरून आपल्या मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेत होते. अशात त्यांचे अनेक फोन कॉल व्हायरल झाले. आता पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांचा सुद्धा असाच एका फोन कॉल व्हायरल होत असून, लोकांना मिरची लागेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाका असा सल्ला ते कार्यकर्त्याला देतायत.
काय आहे 'फोन कॉल'मध्ये...
व्हायरल होत असलेल्या ऑडीओ क्लिपमध्ये भुमरे यांचा एक समर्थक फोन लावून त्यांना शुभेच्छा देत आहे. त्यांनतर पुढे बोलताना भुमरे म्हणतात की, 'पोस्ट सोड जरा, चांगल्या पोस्ट सोड...चांगल्या सोड जरा अशा व्यवस्थित जरा, मिरची लागेल लोकांना अशा सोडा...' असे भुमरे म्हणत आहे. त्यांची ही ऑडीओ क्लिप त्यांच्या मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. तर यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहे.
कोण आहेत भुमरे?
गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेत एकनिष्टने काम करणारे भुमरे यांची एकनिष्टेवर कधीच कुणीही संशय करू शकत नव्हता. पैठण तालुक्यातील पाचोड गावातील ग्रामपंचायत सदस्य पासून त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरवात केली. दरम्यानच्या काळात संत एकनाथ साखर कारखान्यात स्लीप बॉय म्हणून काम करत त्यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा ओढाला. घरची हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी शिवसेनेची साथ सोडली नाही. त्यांच्या हाच एकनिष्ठपणा पाहता पक्षाने 1995 साली त्यांना विधानसभेत उमेदवारी दिली आणि त्यांनी विजय मिळवला. त्यांनतर 2009 ची विधानसभा निवडणूक वगळता आजवर ते या मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत. तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. दरम्यान त्यांनी रोजगार हमी आणि फलोत्पादन विभागाचा कारभार पाहिला. तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहीले.