(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: संजय शिरसाट अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊ नका, आंबेडकरी जनता घरी बसवेल: सचिन खरात
Aurangabad: संजय शिरसाट हे हिंदुत्ववाच्या विचारचं पुरस्कार करतांना स्पष्टपणे दिसत असून, ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचं सचिन खरात म्हणाले आहे.
Aurangabad News: शिंदे गटात सर्वाधिक चर्चेत असलेल्या आमदारांपैकी एक असलेल्या संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी (Sachin Kharat) जोरदार टीका केली आहे. संजय शिरसाट यांनी अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊ नयेत अन्यथा औरंगाबादची आंबेडकरी जनता तुम्हाला घरी बसवेल, असा इशारा खरात यांनी दिला आहे.
शिरसाट यांच्यावर टीका करतांना खरात म्हणाले की, शिरसाट जी लक्षात ठेवा संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला माणूस बनवले. मात्र तुम्ही आंबेडकर चळवळीचे सुद्धा होऊ शकलात नाही. शिवसेने तुम्हाला आमदार केलं, परंतु तुम्ही त्या शिवसेनेचे सुद्धा होऊ शकलात नाही. बाबासाहेबांनी भारतातील सर्व नागरिकांना समानतेचा आणि मानवतेचा विचार दिला. मात्र तुम्ही हिंदुत्ववाच्या विचारचं पुरस्कार करतांना स्पष्टपणे दिसत असून, ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचं खरात म्हणाले.
बाबासाहेबांनी आरक्षण दिले म्हणून शिरसाट औरंगाबाद येथून निवडून आले आहेत. अन्यथा ते कधीच निवडून आले नसते. संजय शिरसाट अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले दिसत आहे. त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यांना औरंगाबाद येथून यापुढे आंबेडकरी जनता कधीही निवडून देणार नसल्याचं, सचिन खरात म्हणाले आहे.
शिरसाट यांच्या कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो गायब...
आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयात लावण्यात आलेल्या फोटोमध्ये मोठा बदल केला आहे. शिरसाट यांच्या कार्यालयात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या फोटोच्या बाजूला आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा फोटो काढण्यात आला आहे. सोबतच उद्धव ठाकरेंच्या जागी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर रोज आमचा गद्दार म्हणून उल्लेख करणाऱ्या लोकांचा फोटो कसा लावावा असा प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत असल्याने त्यांचा फोटो लावला असल्याचही शिरसाट म्हणाले.