Aurangabad: औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत गडकरींची मोठी माहिती; 'त्या' चार गावांमधून ...
Aurangabad News: पाचशे कोटी रुपये खर्च करून औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
Aurangabad News: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्यासाठी कोणतेही भूसंपादन केले जाणार नाही. तसेच ज्या चार गावातून हा रस्ता जाणार आहे, त्याठिकाणी उड्डाणपूल किंवा बायपास टाकण्याबाबत अजूनही निर्णय झाला नसल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. गडकरी हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत मराठवाड्यातील रस्त्यांच्या विकासकामांची माहिती दिली.
यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले, औरंगाबाद ते पैठण या रस्त्याचे चौपदरीकरण होणारच आहे. यामध्ये तीन पाईपलाईन असून, त्यांना वाचवून फायनल डीपीआर बनवला आहे. हा पाचशे कोटींचा रस्ता असणार आहे. तसेच चार गावाच्यामधून हा रस्ता जाणार आहे. या रस्त्यासाठी कोणतेही भूसंपादन केले जाणार नाही. मात्र ज्या चार गावातून रस्ता जाणार आहे, त्याबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झाला नसून ते तपासून घेणार आहे. त्यामुळे त्या गावात भुयारी मार्ग बनवायचा की उड्डाणपूल टाकायचा अथवा बायपास करायचा याचा निर्णय अभ्यास करून घेऊ. चौपदरीकरण केल्यावर अपघात होऊ नयेत याची काळजी घेणं महत्वाचे असल्याचं गडकरी म्हणाले. त्यामुळे बिडकीन, ढोरकीन, चित्तेगाव आणि गेवराई या चार गावांबद्दल आगामी काही दिवसांत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यासाठी आणखी दोन हजार कोटी...
यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की, मराठवाडयात 56 प्रकल्प होते. त्या सर्वांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मराठवाडयात आणखी 2 हजार कोटींचे नवीन प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. तर औरंगाबादमध्ये डब्बल डेकर पूल बनवणार आहे. कारण शहरातून विमानतळाकडे जाणार हा रस्ता असून, आता या शहराची ओळख म्हणून हा रस्ता होईल.
औरंगाबाद-पुणे अडीच तासात..
तर पुढे बोलतांना गडकरी म्हणाले की, पुणे-औरंगाबाद महामार्ग 6 लेनचा बांधायचं ठरल आहे. हा पूर्ण रस्ता 268 किलोमीटरचा असणार असून, आज याबाबत अंतिम आराखडा तयार झाला आहे. त्यामुळे पुणे- औरंगाबाद अंतर अडीच तासात पूर्ण करता येईल. तसेच या रस्त्याला सुरत आणि चेन्नई हायवे जोडला जाणार आहे. तसेच हाच रस्ता समृद्धीला सुध्दा जोडणार जाणार आहे. यासाठी 12 हजार कोटी लागणार आहे. तर औरंगाबाद, दिल्ली, बंगलोर, चेन्नई असा हा एकच मार्ग होईल, असेही गडकरी म्हणाले.