Aurangabad : संक्रातीचं अनोखं वाण! सासूने सुनेला किडनी देऊन वाचवले प्राण; औरंगाबादेतील घटना
Aurangabad News: औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथील सासूने आपल्या सुनेला किडनी देऊन तिचे प्राण वाचवले आहेत.
Makar Sankranti 2023: सासू-सुनेच्या नात्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. समाजात सहसा या नात्याबद्दल आपण नेहमीच नकारात्मक बातम्या ऐकतो आणि पाहत असतो. मात्र सर्वच सासवा सारख्या नसतात, हे देखील तेवढंच सत्य आहे. कारण औरंगाबादमध्ये सासू-सुनेच्या नात्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. कारण काही सासू सुनेवर मुलीइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम करते, हे औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथील जैस्वाल कुटुंबातील सासूने सिद्ध करून दाखविले आहे. या सासूने आपल्या सुनेला किडनी देऊन तिचे प्राण वाचवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लासूर स्टेशन येथील योगिता संजय जैस्वाल या गेल्या वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. कित्येक महिन्यांपासून त्यांच्यावर डायलेसीस करावे लागत होते. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डॉक्टरनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र त्याच रक्त गटाची किडनी मिळणं एवढे सोपं नव्हते. इतर नातेवाइक तसेच इतरांची किडनी त्यांना जुळत नव्हती. यामुळे जैस्वाल कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले. याबाबत कुटुंबात चर्चा होत असतांनाच क्षणाचाही विचार न करता 64 वर्ष वयाच्या योगिता यांच्या सासू रत्नाबाई रमेश जैस्वाल यांनी किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली.
योगिता यांच्या सासूने आपल्या सुनेला किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांची किडनी योगिता यांना जुळते की नाही, सासू रत्नाबाई यांचे वय लक्षात घेता त्यांना कोणती आरोग्यविषयी अडचणी भविष्यात येणार नाही ना याचा कुटुंबातील सदस्यांनी आरोग्य चाचणी केली. यासाठी योगिता यांचे पती संजय जैस्वाल यांनी तामिळनाडू येथील कोवाई रुग्णालयाशी संपर्क साधला. दोघींच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांची किडनी सुनेसाठी जुळेल असे स्पष्ट झाले. त्यानंतर 14 जानेवारीला संक्रांतीच्या पूर्व संध्येला शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. कोईमतूर (तमिळनाडू) येथील कोवाई रुग्णालय येथे तब्बल नऊ तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
कौतुकास्पद निर्णय!
सासूने सुनेला मारहाण केली, हुंड्यासाठी घराबाहेर काढले असे अनेक गुन्हे राज्यात रोज पोलिसांत दाखल होतात. मात्र प्रत्येक सासू सारख्या नसतात हे रत्नाबाई रमेश जैस्वाल यांच्या निर्णयाने पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यांच्या या निर्णयाने सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. तर त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या सुनेचे प्राण वाचले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! पाठलाग करणाऱ्या नागरिकांवर मंगळसूत्र चोरट्यांनी रोखली पिस्तुल; औरंगाबादेतील घटना