Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचे आपत्कालीन गेट बंद, विसर्गही कमी; मोक्षघाट पुन्हा सुरु
Aurangabad: एकूण 27 दरवाज्यांपैकी 9 आपत्कालीन दरवाजे बंद करण्यात आले आहे.
Jayakwadi Dam Water Level: वरील धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे धरणाचा विसर्गही कमी करण्यात आला असून, सद्या 37 हजार 728 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर एकूण 27 दरवाज्यांपैकी 9 आपत्कालीन दरवाजे सुद्धा बंद करण्यात आले आहे. सद्या धरणाच्या 10 ते 27 अशा एकूण 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
18 सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणातून संपूर्ण 27 दरवाज्यातून 1 लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. मात्र त्यानंतर वरील धरण परिसरात पाऊस थांबल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग टप्या-टप्याने कमी करण्यात येत आहे. आज सकाळी 10 वाजता गेट क्र. 10 ते 27 असे एकुण 18 गेटमधून 2 फुटाने 37 हजार 728 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
मोक्षघाट पुन्हा सुरु...
धरणातून संपूर्ण 27 दरवाज्यातून 1 लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुराचे पाणी नाथ मंदिराच्या मागील बाजूच्या मोक्षघाटाला जावून लागले होते. त्यामुळे मोक्षघाटावरील धार्मिक विधी करण्यासाठी आणि घाटावर सर्वसामान्यांना जाण्यासाठी प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र आता पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने गोदावरी पात्रातील पाणीपातळी सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी मोक्षघाट पुन्हा सुरु करण्यात आला आहे.
पाण्याची आवक कमी-जास्त...
जायकवाडी धरणाच्या वरील बाजूस पाऊस कमी जास्त होत असल्याने पाण्याची आवक सुद्धा कमी जास्त होत आहे. आज पहाटे 5 वाजता जायकवाडी धरणात 28 हजार 799 क्युसेकने पाण्याची आवक सुरु होती. मात्र तीच आवक सकाळी 7 वाजता 47 हजार 912 झाली आहे. त्यामुळे पाण्याची आवक सतत कमी जास्त होत असून, त्यानुसार गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! NIA-ATS कडून औरंगाबादसह परभणीत छापेमारी;पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात