Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, यावर याचिकाकर्ते अहमद मुस्ताक यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना अहमद मुस्ताक म्हणाले की, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं असं जनतेची मागणी नाही. हा राजकारणाचा भाग असून, राजकीय पोळी भाजवण्यासाठीच औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं जातंय. त्यामुळे आम्ही त्याला विरोध करत आहोत. एखाद्या व्यक्तीविषयी आम्हाला प्रेम नाही ना द्वेषही नाही. तर शहराचे नाव बदलल्यास दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि उद्याच्या पिढीला हे सहन करावं लागणार आहे. शहरात शांतता कायम राहावी यासाठी या शहराचं नाव औरंगाबादच राहिलं पाहिजे असं याचिकाकर्ते अहमद मुस्ताक म्हणाले.
औरंगाबादच्या नावामागे तब्बल 388 वर्षाची परंपरा आहे. इथे सर्वधर्मसमभाव लोक आनंदाने राहतात. मात्र नामांतराचा निर्णय झाल्यावर लोकांमध्ये दरी निर्माण होईल. ज्यावेळी या शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्यात आलं त्यावेळेस जातीयवाद तणाव नव्हता. तसेच कुठेही जातीय तेढ निर्माण झाली नाही. मात्र दोन वेळा जेव्हा शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आला त्यावेळी विरोध झाला आणि मोर्चे निघाले, असे अहमद मुस्ताक म्हणाले.
अन्यथा पक्षातून काढून टाका...
1995 ला औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव आला होता. त्यावेळीही मी विरोध केला होता. त्याचेही हेच कारण होतं. त्यावेळीही गुंडागर्दी करून ठराव पास करण्यात आला होता. मी राजकारणी आहे परंतु मी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करतो. त्यामुळे मी माझ्या पक्षाला स्पष्ट सांगितलं आहे की, मी यापूर्वीही याचिका टाकली होती आणि आत्ताही याचिका करत आहे. तुम्हाला हवे असेल तर पक्षात ठेवा अन्यथा काढून टाका, असेही अहमद मुस्ताक म्हणाले.
नामांतराचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा होता
ठाकरे सरकारमध्ये जेव्हा नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित हे खरं आहे. त्याबाबत शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केला आहे. नामांतराची चर्चा झाली, विरोध झालं मात्र निर्णय मुख्यमंत्री घेतात, त्यामुळे तो निर्णय मुख्यमंत्र्यांचा होता. सभागृहामध्ये या प्रस्तावाला विरोध झाला होता, असेही अहमद मुस्ताक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad Rename: औरंगाबादच्या नामांतराचा वाद उच्च न्यायालयात, याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी
ठरलं! भाजप-शिंदे गट महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवणार; जागा वाटपाची प्राथमिक बैठकही झाली