Aurangabad News: आगामी महानगरपालिका निवडणूक तोंडावर असतानाच आता राजकीयदृष्ट्या मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आणि शिंदे गट आगामी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपाच्या बाबतीत पहिली प्राथमिक बैठक सुद्धा पार पडली आहे. शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. 


राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती झाली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा अशीच युती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याची सुरवात औरंगाबाद महानगरपालिकेपासून झाली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे गटाची भाजपसोबत प्राथमिक बोलणी झाली आहे. मात्र जागावाटपाचा अजूनही कोणताही निर्णय झाला नाही. त्याबाबत पुढील काळात आणखी काही बैठका होणार असून ,त्यांनतर अंतिम निर्णय होणार आहे. 


काय म्हणाले जंजाळ...


याबाबत बोलतांना जंजाळ म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आगमी सर्व निवडणूक लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे जागावाटपाच्या बाबतीत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. औरंगाबाद महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आम्ही एकत्र लढणार आहोत. अनेक चांगले नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. भाजपसोबतची युती कायम ठेवून, आमचा मुख्य मुद्दा असलेल्या हिंदुत्ववासाठी एकत्र निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आगमी निवडणूकीत आम्हाला चांगले यश मिळेल अशी अपेक्षा असल्याचं जंजाळ म्हणाले. 


निवडणूक हिंदुत्ववाच्या मुद्द्यावर 


भाजप-शिंदे गटाची युती झाल्यावर दोन्ही पक्ष हिंदुत्ववाचा मुद्दा हाती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. तर निवडणुकीत आमचा मुख्य मुद्दा हिंदुत्ववाचा असणार असल्याचं जंजाळ यांनी सुद्धा स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा आघाडीवर असणार आहे. तर खाण की बाण हाच मुद्दा पुन्हा एकदा औरंगाबादच्या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या...


Ajit Pawar : शेतकरी संकटात असताना राज्यात मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही? अजित पवारांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सवाल


Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशीच आणखी एक धक्का, एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर